belgaum

बदलीनिमित्त भूषण बोरसे यांना निरोप

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलीस आयुक्त म्हणून १५ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मावळते पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे (IPS) यांची बदली झाल्याने गुरुवारी त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात भावपूर्ण निरोप देण्यात आला. नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी बोरसे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

गुरुवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयात शासकीय इतमामात बोरसे यांना निरोप देण्यात आला. यावेळी नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम, डीसीपी एन. व्ही. बरमनी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बोरसे यांनी बेळगाव शहरातील आपल्या १५ महिन्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना नागरिक, लोकप्रतिनिधी, विविध समाज संघटना आणि पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. आपल्या कार्यकाळात बेळगावकरांनी पोलिसांना दिलेले सहकार्य आणि विश्वास यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रभावीपणे काम करता आल्याचे त्यांनी सांगितले.

अमली पदार्थांविरोधात कारवाई

बोरसे यांच्या कार्यकाळात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. नागरिकांच्या सहकार्यामुळे अमली पदार्थांविरोधातील कारवाईला मोठे बळ मिळाले. ड्रग्जविरोधातील मोहिमेला सातत्याने प्राधान्य देण्यात आल्याचे बोरसे यांनी सांगितले.

 belgaum

वाहतूक व्यवस्थेत सुधारणा

बेळगाव शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. वाहनांची सुरळीत वाहतूक, नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्याचे त्यांनी नमूद केले.

गुन्हे नियंत्रण आणि मुद्देमाल वसुली

गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवतानाच चोरीला गेलेल्या मालमत्तेचा मोठ्या प्रमाणात शोध घेऊन ती मूळ मालकांना परत करण्यात पोलिसांना यश आले. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दलाने सातत्याने काम केले.

बंद, आंदोलने आणि विविध संवेदनशील प्रसंगांमध्येही परिस्थिती नियंत्रणात ठेवत शांतता कायम राखण्यात पोलिसांना यश आले. यासाठी कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत संपूर्ण पोलीस दलाने एक टीम म्हणून काम केल्याचे बोरसे यांनी आवर्जून सांगितले.

‘बेळगावकरांसाठी नेहमीच एका फोनच्या अंतरावर’

नव्या नियुक्तीवर हुबळीला जात असले तरी बेळगावशी असलेले आपले नाते कायम राहील, असे बोरसे यांनी सांगितले. बेळगावकरांनी दिलेले प्रेम आणि सहकार्य कायम लक्षात राहील. भविष्यातही कोणत्याही प्रसंगी आपण ‘फक्त एका फोनच्या अंतरावर’ असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

दरम्यान, नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून, गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन शांततेत पार पाडणे हे आपले तातडीचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बोरसे यांच्या कार्यकाळात झालेली चांगली कामे पुढे नेण्याचा प्रयत्न करू, असे निकम यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.