बेळगाव लाईव्ह: घरातील ज्येष्ठ व्यक्तींना एकटे सोडून काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणे अनेक कुटुंबांसाठी मोठी अडचण ठरते. हीच गरज ओळखून शांताई वृद्धाश्रमाच्या परिसरात ‘चंदन कमळ निवास’ या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आपुलकीचे वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
घरातील वृद्ध आई-वडील किंवा ज्येष्ठ व्यक्तींना काही दिवसांसाठी एकटे सोडून बाहेर जावे लागणाऱ्या कुटुंबांना आता मोठा आधार मिळणार आहे. चंदन कमळ निवासमध्ये ज्येष्ठ नागरिकांना १० ते १५ दिवसांपर्यंत मोफत ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या काळात त्यांच्या सुरक्षिततेची आणि आवश्यक सोयी-सुविधांची काळजी घेतली जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच डिलक्स खोल्यांचेही उद्घाटन करण्यात आले. वृद्धांना घरापासून दूर असतानाही घरच्यासारखे वातावरण आणि आपुलकी मिळावी, या भावनेतून ही सुविधा उभारण्यात आली आहे.
या कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमही राबविण्यात आले. ‘विद्या आधार’च्या सहकार्याने शाहापूर येथील न्यू गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या शाळेची फी भरण्यात आली. तसेच बामणवाडी प्राथमिक सरकारी शाळेला खुर्च्यांचे वितरण करण्यात आले.
शहरात सामाजिक कार्य आणि गरजूंच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सोशल वर्कर रेस्क्यू टीमच्या सदस्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या त्यांच्या समर्पित कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अनिल जैन, सुनील बुम, सुशील सुंचेती आणि संदीप मोघा उपस्थित होते. यावेळी पॉलीहायड्रॉन फॅक्टरीचे सिद्धार्थ हुंदरे, सावली केअर सेंटर कोल्हापूरचे अध्यक्ष किशोर देशपांडे, अशोक आयर्न वर्क्सचे दयानंद कदम, भगवान वालावलकर, नागेश पाटील, शांताईचे, विजय पाटील आणि माजी महापौर विजय मोरे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘वृद्ध व्यक्ती ही कुटुंबाची जबाबदारी नसून कुटुंबाची माया आणि आशीर्वाद आहेत,’ या भावनेतून सुरू करण्यात आलेला चंदन कमळ निवास हा उपक्रम अनेक कुटुंबांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. काही दिवसांसाठी घरापासून दूर जावे लागले तरी आपल्या आई-वडिलांना किंवा ज्येष्ठांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात ठेवता येणार असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.





