बेळगाव लाईव्ह : राज्य शासनाने बेळगावच्या पोलीस आयुक्तपदात केलेल्या बदलानंतर निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपणार आहे. २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश अमृत निकम गुरुवारी सकाळी बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मावळते पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे हे निकम यांच्याकडे पदभार सोपवणार आहेत.
राज्य शासनाने २९ ऑगस्ट रोजी केलेल्या १५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भूषण बोरसे यांची बेळगावहून हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली, तर त्यांच्या जागी प्रकाश निकम यांची बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
शासकीय आदेशानंतर निकम हे तातडीने पदभार स्वीकारतील, अशी शक्यता होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा पोलीस बंदोबस्त लक्षात घेता पदभार हस्तांतरण लांबणीवर पडले. त्यामुळे बोरसे यांची बदली झाली असतानाही ते बेळगावमध्येच कार्यरत राहिले होते.
दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडल्यानंतरच बोरसे यांना बेळगावमधून कार्यमुक्त करून निकम यांच्याकडे पदभार सोपवावा, अशी मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात पालकमंत्री तसेच प्रशासनाकडेही मागणी करण्यात आली होती.

आता गुरुवारी सकाळी प्रकाश निकम अधिकृतपणे बेळगाव पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.
बेळगावशी निकम यांचे जुने नाते
प्रकाश निकम हे २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांच्या सेवाकाळाच्या सुरुवातीला त्यांनी बेळगाव ग्रामीण विभागात प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे बेळगावचा भौगोलिक परिसर तसेच येथील सामाजिक परिस्थितीची त्यांना पूर्वकल्पना आहे. या अनुभवाचा फायदा शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळताना होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, भूषण बोरसे यांनीही बेळगाव शहर पोलीस आयुक्त म्हणून सुमारे वर्षभर काम केले. संवेदनशील विषयांवर संयमाने हाताळणी करताना कायदा व सुव्यवस्था राखण्यावर त्यांनी भर दिला. आता ते हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
बेळगावच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे आता प्रकाश निकम यांच्या हाती येणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पोलिसिंगला कोणती नवी दिशा मिळते, याकडे बेळगावकरांचे लक्ष लागले आहे.





