belgaum

तब्बल ४२ तासांनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात यंदाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सलग ४२ तासांच्या दीर्घ कालावधीनंतर शांततेत पार पडली. शुक्रवारी हुतात्मा चौक येथे विधिवत पूजनानंतर सुरू झालेला हा विसर्जन सोहळा सलग तीन दिवस रात्रंदिवस सुरू होता. शहरातील माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला कपिलेश्वर तलावात विसर्जित होण्याचा पहिला मान मिळाला, ज्यानंतर शहरातील विविध गल्लीबोळांतील शेकडो श्रीमूर्ती विसर्जन मार्गावर दाखल झाल्या.

मिरवणुकीत पारंपरिक वाद्ये, लेझिम, झांजपथक, भजने आणि पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, पाटील गल्ली आणि शनी मंदिर मार्गाने सर्व विसर्जन मिरवणुका कपिलेश्वर तलावाकडे मार्गस्थ झाल्या होत्या. मिरवणूक मार्गावर रामलिंग खिंड गल्ली ते कपिलेश्वर उड्डाणपूल आणि एसपीएम रोड ते महात्मा फुले रोडपर्यंत गणेशमूर्तींच्या गाड्या विसर्जनासाठी रांगेत उभ्या होत्या. शहरातील चव्हाट गल्लीच्या ‘बेळगाव राजा’ या श्रीमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

हा प्रदीर्घ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, बेळगाव महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, हेस्कॉम आणि एल अँड टी या संस्थांनी अहोरात्र काम केले. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर आणि आवाजाची पातळी ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाली होती, तसेच प्लाझ्मा व लेझर लाईट्सचा वापर न करता मंडळांनी सहकार्य केल्याने सुरक्षित वातावरण निर्माण झाले. परगावाहून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सलग ४२ तास कर्तव्य बजावून संपूर्ण सोहळा शांततेत पार पाडला.

 belgaum

मिरवणुकीच्या अगदी शेवटी चव्हाट गल्लीच्या श्रींच्या विसर्जनानंतर बेळगाव महानगरपालिकेच्या अधिकृत श्रीमूर्तीची महाआरती करून विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या या श्रीमूर्तीला निरोप देताना महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, महापालिका आयुक्त कार्तिक एम., अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, माजी आमदार अनिल बेनके आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महाआरतीनंतर ढोल-ताशांच्या तालावर उपमहापौर व अधिकाऱ्यांनी नृत्य करून आनंद व्यक्त केला. शेवटी कपिलेश्वर तलावात महापालिकेच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवाची अधिकृत सांगता झाली.

गणेशमूर्तींची अवाढव्य उंची आणि अंतिम मिरवणुकीतील गर्दीमुळे विसर्जन प्रक्रियेला ३२ ते ४२ तासांचा कालावधी लागून विसर्जन लांबले. भविष्यात मिरवणुकीचा वेळ आणि मूर्तींची उंची यावर कडक मर्यादा आणणे तसेच अतिरिक्त कृत्रिम तलावांची निर्मिती करणे याबाबत आगामी काळात नियोजन केले जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. हा सोहळा शांततेत पार पाडल्याबद्दल लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व नागरिक व गणेशोत्सव मंडळांचे आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.