बेळगाव लाईव्ह: हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी पोलिसांनी अचानक तपासणी मोहीम राबवली. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत कोणतीही प्रतिबंधित वस्तू आढळून आली नाही.
या तपासणी मोहिमेत पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह डीसीपी, एसीपी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सुमारे ६० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. कारागृहातील विविध ठिकाणी तपासणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
हिंडलगा कारागृहात यापूर्वीही प्रतिबंधित वस्तू आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मोबाईल फोन, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर प्रतिबंधित साहित्याच्या घटनांमुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला होता. त्यामुळे पोलिसांकडून वेळोवेळी अचानक तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत.
गेल्या महिन्यातही कारागृहात तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या महिन्यात पुन्हा अचानक झडती घेण्यात आली. यावेळी कोणतीही प्रतिबंधित वस्तू आढळली नसल्याने पोलिसांच्या तपासणी मोहिमेची नोंद झाली आहे.
कारागृहात प्रतिबंधित वस्तूंची तस्करी रोखणे आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत ठेवण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून अशा तपासणी मोहिमा सुरू ठेवण्यात येत आहेत.




