बेळगाव लाईव्ह: बेळगावमध्ये विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, शहरातील अनेक भागांतील रस्त्यांची अवस्था पाहता या विकासकामांचे दर्शन प्रत्यक्षात कुठे घडते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक ७ मधील गवळी गल्लीतील चिमुकल्यांनी किल्ला उभारण्यासाठी आणलेल्या मातीचा उपयोग रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी केला. त्यांच्या या कृतीने लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत अंजन घालण्याबरोबरच सामाजिक जाणीवेचा आदर्शही निर्माण केला आहे.
गवळी गल्लीतील रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिक आणि वाहनचालकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांत चिखल साचून गैरसोय आणखी वाढते. ही परिस्थिती लक्षात घेऊन चिमुकल्यांनी स्वतः पुढाकार घेत किल्ल्यासाठी आणलेली माती खड्ड्यांत टाकून रस्ता सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. मुलांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे.
एकीकडे विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे गल्ल्यांमधील खड्डे बुजवण्याची वेळ चिमुकल्यांवर येते, ही बाब विचार करायला लावणारी आहे.
विकासकामांचा निधी नेमका कुठे आणि कशा प्रकारे खर्च होतो, तसेच कामांचा दर्जा आणि देखभाल याकडे पुरेसे लक्ष दिले जाते का, असे प्रश्न या घटनेमुळे निर्माण होतात. लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चिमुकल्यांनी कृतीतून दिलेला हा संदेश समाजाला दिशा दाखवणारा आहे.





