बेळगाव लाईव्ह: कर्नाटक राज्योत्सवानिमित्त १ नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, सकाळी ११ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बेळगाव शहरात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात वाहतूक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी विविध मार्गांवर वाहतूक वळविण्यात आली आहे.
कोणत्या मार्गावरील वाहतुकीत बदल?
१. चिकोडी, संकेश्वर, कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी
केएलई रोड, कृष्णदेवराय सर्कल आणि राणी चन्नम्मा सर्कलमार्गे येणाऱ्या वाहनांनी जिनाबाकुल सर्कल येथे उजवीकडे वळून बॉक्साईट रोड, हिंडलगा फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शर्कत पार्क आणि ग्लोब थिएटर सर्कलमार्गे खानापूर रोडला जावे.
२. मध्यवर्ती बसस्थानकातून खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी
खडेबाजारमार्गे शनिवार खूटकडे जाणाऱ्या वाहनांनी जिजामाता सर्कल, व्हीआरएल लॉजिस्टिक्स आणि जुना पीबी रोडमार्गे जावे.
खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अशोक पिलर, कनकदास सर्कल, निसर्ग ढाबा, केपीटीसीएल रोड, केएलई डेंटल कॉलेज, केएलई हॉस्पिटल, बॉक्साईट रोड, हिंडलगा फॉरेस्ट नाका, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शर्कत पार्क आणि ग्लोब सर्कलमार्गे खानापूर रोडचा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
३. जिजामाता सर्कल व देशपांडे पेट्रोल पंप परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी
नरगुंदकर भावे चौक आणि कंबळी खूटकडे जाणाऱ्या वाहनांनी रविवार पेठ पिंपळ कट्टा, पाटील गल्ली, स्टेशन रोड आणि गोगटे सर्कलमार्गे खानापूर रोडला जावे.

४. खानापूरकडून बेळगाव शहरात येणाऱ्या वाहनांसाठी
काँग्रेस रोडमार्गे येणाऱ्या वाहनांनी मिस्त्री महादेव मंदिराजवळ डावीकडे वळून आसादखान दर्गा आणि गवळी गल्ली क्रॉसमार्गे शहरात प्रवेश करावा.
गोगटे सर्कल रेल्वे उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांनी ग्लोब थिएटर सर्कल येथे डावीकडे वळून गवळी गल्ली क्रॉस, शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शौर्य चौक, गांधी सर्कल, हिंडलगा गणेश मंदिर, हनुमाननगर डबल रोड, बॉक्साईट रोड आणि जिनाबाकुल सर्कलमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ गाठावा.
केएसआरटीसी बससाठी हिंडलगा सर्कल अंडरब्रिज, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ आणि कॅन्सर हॉस्पिटलसमोरील वळणावरून कनकदास सर्कलमार्गे बसस्थानकात प्रवेश करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था
राज्योत्सव मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी पोलिसांनी खालील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
- सीपीएड मैदान, क्लब रोड
- स्टॅच्यू मैदान, पोलीस मुख्यालय
- महिला पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेली पोलीस विभागाची मोकळी जागा
- देशपांडे खूट ते गांधी सर्कलदरम्यान वेंगुर्ला रोडवरील डेअरी फार्मची जागा (सेंट झेवियर्स शाळेजवळ)
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
राज्योत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि मिरवणुकीसाठी येणाऱ्या नागरिकांनी निर्धारित पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.




