बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेने शहरात विविध उपाययोजना आणि सुविधांची तयारी पूर्ण केली आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी सहा मोबाईल टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असून, हे टँकर नागरिकांच्या घराजवळ पोहोचणार आहेत. त्यामुळे नागरिकांना घराजवळच गणपती मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे अशी माहिती बेळगाव महापालिकेचे आयुक्त एम कार्तिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील प्रमुख विसर्जन तलावांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. कपिलेश्वर येथील नवीन व जुना तलाव, जक्केरी तलाव, ब्रह्मदेव मंदिराजवळील तलाव, नजर कॅम्प, किल्ला तलाव आणि कणबर्गी येथील तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून, विसर्जनाच्या दिवशी क्रेनचीही व्यवस्था केली जाणार आहे.
गणेश विसर्जनाच्या प्रमुख मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. यासाठी महापालिकेचे अभियंते, KUWSDB, L&T तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गांची पाहणी केली आहे. टप्प्याटप्प्याने रस्त्यांची दुरुस्ती केली जात असून, गणेशोत्सवापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी सिंगल विंडो व्यवस्था
सार्वजनिक गणेश मंडळांना विविध परवानग्या मिळवताना अडचणी येऊ नयेत यासाठी पोलीस ठाण्यात सिंगल विंडो सिस्टम सुरू करण्यात आली आहे. सर्व आवश्यक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळांची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेशोत्सवासाठी आवश्यक नियम व मार्गदर्शक तत्त्वांबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेच्या अभियंता आणि आरोग्य विभागाकडून नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख केली जात आहे.
रोषणाईसाठी १० लाखांचा निधी
गणेशोत्सवाच्या काळातील अधिकृत रोषणाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाख रुपये, असा एकूण १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकृत परवानगी असलेल्या ठिकाणी या निधीतून रोषणाईची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महापालिकेची कर वसुली ५२ कोटींवर
दरम्यान, महापालिकेच्या कर वसुलीकडेही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी महापालिकेची एकूण कर मागणी सुमारे ८२ ते ८३ कोटी रुपये असून, मागील थकबाकीसह एकूण मागणी सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यापैकी आतापर्यंत ५२ ते ५३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

मे, जून आणि जुलैपर्यंत कर भरणाऱ्यांना १० टक्के रिबेट देण्यात आला होता. ही मुदत आता संपल्याने उर्वरित कराची पूर्ण वसुली करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः ५० हजार आणि १ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या करदात्यांकडून वसुली करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
क्रीडा सुविधांच्या उन्नतीकरणावर भर
महापालिका क्षेत्रातील जलतरण तलावांची सुविधाही सुरू आहे. दक्षिण भागातील एक आणि अशोकनगरजवळील एक, असे दोन जलतरण तलाव सध्या कार्यरत आहेत. याशिवाय अर्बन चॅलेंज फंडाच्या माध्यमातून शहरातील क्रीडा पायाभूत सुविधांचे आंतरराष्ट्रीय दर्जानुसार उन्नतीकरण करण्याचा महापालिकेचा विचार आहे.
जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट आणि इतर क्रीडा सुविधा निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदारांना चालविण्यास देण्याची योजना असून, त्यांच्याकडून महापालिकेला दरवर्षी ठरावीक रक्कम मिळणार आहे.
एकूणच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन व्यवस्था, रस्ते दुरुस्ती, रोषणाई, परवानगी प्रक्रिया आणि इतर मूलभूत सुविधांची तयारी महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे.





