belgaum

बेळगावला जागतिक एरोस्पेस हब बनण्याची मोठी क्षमता

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जागतिक स्तरावरील एरोस्पेस उत्पादनाचे मोठे केंद्र उभारण्याची क्षमता आहे. एईक्वसच्या माध्यमातून या भागातील उत्पादन क्षमता आणि कौशल्यांचा सातत्याने विस्तार केला जात असून, भविष्यात बेळगाव जागतिक एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उदयास येऊ शकते, असा विश्वास एक्वसचे अध्यक्ष व सीईओ अरविंद मेलिगेरी यांनी व्यक्त केला.

बेळगाव येथील एईक्वस कॅम्पसमध्ये झालेल्या संवादादरम्यान ते बोलत होते. एईक्वसने बंगळुरूसारख्या मोठ्या शहराऐवजी बेळगावमध्ये एरोस्पेस इकोसिस्टम उभारण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक औद्योगिक केंद्रांबाहेरही अत्याधुनिक उत्पादन व्यवस्था यशस्वीपणे उभारता येऊ शकते, या विश्वासातून हा निर्णय घेण्यात आल्याचे मेलिगेरी यांनी सांगितले.

2007 मध्ये एईक्वसने बेळगावमध्ये काम सुरू केले, तेव्हा अनेक अडचणी होत्या. त्या काळात पुरेशा हॉटेल सुविधा आणि हवाई संपर्काचा अभाव असल्याने कंपनीच्या ग्राहकांना लांबचा रस्ता प्रवास करावा लागत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

 belgaum

एईक्वसने स्थानिक समुदायाला केंद्रस्थानी ठेवून रोजगारनिर्मिती केली आहे. आसपासच्या विविध भागांतून कंपनीकडे कर्मचारी येतात. तसेच एईक्वस फाउंडेशनच्या माध्यमातून शाळांना मदत, शिक्षक प्रशिक्षण, STEM शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती यांसारखे उपक्रम राबवले जात असल्याचे मेलिगेरी यांनी सांगितले.

“मॅन्युफॅक्चरिंग हा शेवटी लोकांचा व्यवसाय आहे,” असे सांगत स्थानिक कौशल्यविकास आणि उद्योग-समुदाय यांच्यातील समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

एरोस्पेस हा एईक्वसचा मुख्य व्यवसाय असला तरी कंपनी आता कन्झ्युमर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही विस्तार करत आहे. या व्यवसायासाठी तुलनेने कमी भांडवलाची गरज असून भांडवलावर आकर्षक परतावा मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या एरोस्पेस क्षेत्रात मोठी संधी

जागतिक एरोस्पेस आउटसोर्सिंगमध्ये भारताचा सध्या सुमारे 2 टक्के वाटा आहे. हा वाटा किमान 10 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य भारताने ठेवायला हवे, असे मेलिगेरी यांनी म्हटले. भारतातील अभियांत्रिकी आणि उत्पादन खर्च तुलनेने कमी असल्याने जागतिक एरोस्पेस कंपन्यांकडून भारतातील सोर्सिंग वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

एईक्वसकडून उत्पादन क्षमतांमध्ये सातत्याने वाढ केली जात असून दर महिन्याला सुमारे 120 ते 240 नवीन एरोस्पेस पार्ट्स तयार करण्याची क्षमता कंपनीने विकसित केली आहे. ही क्षमता भविष्यात दर महिन्याला 300 ते 500 पार्ट्सपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे मेलिगेरी यांनी सांगितले.

भारताचा दीर्घकालीन फायदा हा मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळात आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये उत्पादन क्षमता कमी होत असताना भारतात उत्पादन क्षेत्रात काम करण्यास इच्छुक तरुणांची मोठी संख्या उपलब्ध आहे, असे त्यांनी नमूद केले.

विशेष कौशल्ये विकसित करण्यासाठी एईक्वसने विविध कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. सरफेस ट्रीटमेंट, फोर्जिंग, कन्झ्युमर मॅन्युफॅक्चरिंग आणि डिफेन्स यांसारख्या क्षेत्रांत कंपनीचे संयुक्त उपक्रम सुरू आहेत.

“कोणत्याही किंमतीत नवी क्षमता विकसित करणे हे आमचे पहिले उद्दिष्ट आहे,” असे मेलिगेरी यांनी सांगितले. भारतात एरोस्पेस घटकांचे उत्पादन करण्यासाठी ग्राहकांनी सर्वप्रथम एईक्वसचा विचार करावा, असे स्थान निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बेळगाव परिसरातील एरोस्पेस इकोसिस्टम वेगाने विकसित होत आहे. उद्योजक, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारी यंत्रणा यांच्यातील सहकार्य वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

एईक्वसची गुंतवणूक आणि विस्ताराची दिशा 50 वर्षांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनातून आखण्यात आली आहे. अल्पकालीन प्रकल्पांऐवजी कायमस्वरूपी औद्योगिक पाया निर्माण करण्यावर कंपनीचा भर असल्याचे मेलिगेरी यांनी स्पष्ट केले.

“एरोस्पेस क्षेत्राने अजून केवळ सुरुवात केली आहे,” असे सांगत बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात या क्षेत्राच्या विस्ताराची प्रचंड क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

news courtasy :Indian Express

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.