बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या प्रादेशिक निवडणूक क्षेत्रांची विभागणी आणि वर्गवार जागांची आरक्षण अधिसूचना जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेमुळे ग्रामीण भागात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून, इच्छूक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायती नंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल देखील वाजणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या ठिकाणी लागले आहे.
कर्नाटक ग्राम स्वराज आणि पंचायत राज अधिनियम, १९᱙३ च्या कलम ५ च्या उपकलम (५) नुसार प्रदत्त झालेल्या अधिकारांचा वापर करून, बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही सविस्तर अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या भौगोलिक व्याप्तीनुसार प्रादेशिक निवडणूक क्षेत्रांची फेररचना करण्यात आली असून, एकूण सदस्य संख्या आणि विविध प्रवर्गांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
या अधिसूचनेच्या फेररचनेमध्ये अरळीकट्टी, येळ्ळूर, उचगाव, कडोली, मारीहाळ, सुळगे (उ), अंकलगि, होसवंटमूरी, मुतगा, हंदिगनूर, केदनूर, बंबरगे, किणये आणि मुच्चंडी या प्रमुख ग्रामपंचायतींसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत ही क्षेत्र विभागणी आणि आरक्षण व्यवस्था लागू राहणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील वॉर्डनिहाय व्याप्ती स्पष्ट करण्यात आली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग (अ आणि ब) तसेच महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागांची सविस्तर आकडेवारी या प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रात नमूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायतनिहाय क्षेत्रांची व्याप्ती आणि वर्गवार आरक्षणाचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आला असून, ग्रामीण भागात निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे.





