बेळगाव लाईव्ह : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १२ दिवस चालणारा हा उत्सव अत्यंत उत्साहात, सुरक्षिततेने आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वीजबिलासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांची तरतूद केल्याबद्दल महामंडळ व उपस्थित गणेश भक्तांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विविध गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी प्रशासनासमोर आपल्या समस्या व महत्त्वाच्या सूचना मांडल्या. महामंडळाने दिलेल्या निवेदनात रस्त्यांची वेळेत दुरुस्ती करणे, लाल मातीचे तात्पुरते ठिगळ लावण्याऐवजी गुणवत्तापूर्ण काम करणे, तसेच गणेशोत्सव संपेपर्यंत एल अँड टी कंपनी व इतर संबंधित विभागांनी रस्ते खोदकाम पूर्णपणे बंद ठेवावे, अशा मागण्या केल्या आहेत. याशिवाय मंडप परिसराची स्वच्छता राखणे, मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटणे, उघड्या गटारांवर ढापणे बसवणे, तात्पुरती शौचालये उभारणे आणि मूर्तीशाळांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षा आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने हेस्कॉमने लटकणाऱ्या धोकादायक विद्युत तारा हटवून योग्य रोषणाई करावी, ८ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ‘एक खिडकी योजना’ सुरू करून परवानग्या सुलभ कराव्यात, तसेच रात्रीच्या वेळी केएसआरटीसीच्या जादा बसेस सोडाव्यात, अशा मागण्याही मांडण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी वनिता विद्यालय ते धर्मवीर संभाजी चौकादरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांसाठी तात्पुरती प्रेक्षक गॅलरी उभारावी, तसेच हॉटेल व खाद्यपदार्थांची दुकाने उशिरापर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली.
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दीड महिना आधीच बैठक घेऊन सर्व मंडळांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. सर्व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांना आणि गणेश भक्तांना आवाहन करताना ते म्हणाले की, हा आपला हिंदू सण अत्यंत पवित्र आणि हिंदू संस्कृतीला साजेसा अशा पद्धतीनेच आपण साजरा केला पाहिजे, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन गणेश भक्तांनी करावे, तसेच गणेश भक्तांनी मांडलेल्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पेडणेकर यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी , मध्यवर्ती महामंडळाचे सरचिटणीस महादेव पाटील, उपाध्यक्ष सागर पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, राजू बिर्जे, प्रशांत भातकांडे, संजय जाधव यांच्यासह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.





