बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळ महानगर, बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेली ही उत्सव परंपरा बेळगावात शतकाहून अधिक काळापासून अविरत सुरू असून, संपूर्ण देशात गणपती उत्सव साजरा करणारे दुसरे मोठे शहर म्हणून बेळगावची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांना व भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महामंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कपिलेश्वर मंदिरातील तलाव, विहीर आणि जवेरी तलावांतील गाळ काढून स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे. ही जागा लहान असल्याने ती मोठी करण्याबाबत पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांनी घेतलेला निर्णय अद्याप अमलात आलेला नाही, तरी हे काम तात्काळ पूर्ण करावे. याशिवाय बेळगाव शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. बेळगाव हे ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समाविष्ट असल्याने स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच गणेश मंडपांच्या दीपरोषणाईमुळे विद्युत तारांच्या बाबतीत खबरदारी घेणे आणि मिरवणुकीत अडथळा ठरणार्या वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे आवश्यक आहे.
रस्त्यांच्या कामाबाबत ‘एल अँड टी’ कंपनीने अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने गणपती मिरवणुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास बेळगावची जनता कंपनीविरुद्ध आंदोलन करेल आणि विसर्जनाच्या वेळी दुर्घटना घडल्यास कंपनीलाच थेट जबाबदार धरले जाईल, असा इशाराही महामंडळाने दिला आहे. यासोबतच गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आणि विशेषतः महिला मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करावी.

उत्सवाच्या काळात गणेश मूर्ती पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी बाहेरगावाहून लोक येतात, त्यामुळे शहरातील कपडे, इलेक्ट्रॉनिक्स व इतर दुकाने उशिरापर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लाखो नागरिकांसह लहान मुले व मुली सहभागी होत असल्याने त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य गॅलरी व्यवस्था करण्यात यावी.
बेळगावचे नागरिक देश-विदेशात वास्तव्यास असून हे थेट प्रक्षेपणाद्वारे (लाइव्ह) उत्सव पाहत असल्याने स्वच्छता, शिस्त आणि नेटकेपणा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने या सर्व उपाययोजनांना प्राधान्य देऊन कामे पूर्ण करावीत, अशी विनंती महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि कार्यदर्शी हेमंत हावळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सुनील जाधव सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.





