belgaum

गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही: पोलीस आयुक्त भूषण बोरसे

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील आगामी गणेशोत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षिततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारी बैठकीत बोलताना शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी उत्सवादरम्यान डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी राहील, असे स्पष्ट केले. गेल्या वर्षीही डीजेला परवानगी दिली नव्हती आणि या निर्णयाचे ज्येष्ठ नागरिकांनी मोठे स्वागत केले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.

गुरुवारी कुमार गंधर्व कला मंदिरात पार पडलेल्या या बैठकीत पोलीस आयुक्तांनी गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या. बेळगावातील सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची कमाल १२ फुटांपर्यंतच मर्यादित असणार आहे.

तसेच मोठ्या मूर्तींच्या विसर्जन प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा अडथळा येऊ नये यासाठी मूर्तींना अनिवार्यपणे ‘हुक’ बसवण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याचे सांगतानाच, शहरातील १४ लाख नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व मंडळांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 belgaum

सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून प्रत्येक गणेश मंडळात एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. चोरी, सोनसाखळी लुटणे आणि पाकीटमारीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व मंडपांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच ध्वनिवर्धकांवर कोणत्याही प्रकारची अश्लील गाणी वाजवण्यास सक्त मनाई असणार असून, रात्री १० वाजेनंतर कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा ध्वनिवर्धक वाजवण्यावर पूर्ण बंदी राहील. या सर्व नियमांचे सर्व गणेशोत्सव मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.