बेळगाव लाईव्ह : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा, सुरक्षा व्यवस्था आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या नव्या सुविधांची माहिती दिली.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्त्यांची स्थिती चांगली ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषतः एलअँडटीच्या कामांमुळे प्रभावित झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यावर भर राहणार आहे.
महापौर, उपमहापौर, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि गणेश महामंडळाचे पदाधिकारी यांच्यावर काही-काही रस्त्यांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. अशा पद्धतीने शहरातील जवळपास १०० रस्त्यांवर देखरेख ठेवली जाणार असून, पुढील २० दिवसांत एलअँडटीच्या माध्यमातून दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गणेश मंडळांना वीजबिलातून मोठा दिलासा
गणेश महामंडळाच्या मागणीवर यंदा शहरातील गणेश मंडळांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. गणेश मंडपांसाठी लागणाऱ्या विजेचे संपूर्ण बिल माफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
या वीजबिलाचा ५० टक्के खर्च जिल्हा प्रशासन, तर उर्वरित ५० टक्के खर्च महानगरपालिका करणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचे विशेष नियोजन
गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनानेही व्यापक तयारी केली आहे. पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीचा तसेच संवेदनशील ठिकाणांचा आढावा घेतला असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
बेळगावमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात गणेशोत्सव पार पडेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण
यंदाच्या गणेशोत्सवात महानगरपालिकेकडून नवी संकल्पना राबवली जाणार आहे. सरदार मैदान, संभाजी मैदान यांसारख्या २ ते ३ प्रमुख मैदानांमध्ये गॅलरी आणि मोठ्या एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार आहेत.
गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण (Live Coverage) या स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर गर्दीत उभे राहण्याऐवजी मैदानातील गॅलरीमध्ये बसून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता येणार आहे.
यासोबतच या मैदानांमध्ये हॉकिंग झोन तयार करण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांना उत्सवाचा आनंद घेताना खाद्यपदार्थ आणि स्नॅक्सचाही आस्वाद घेता येणार आहे.
गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि अधिक सुविधांसह पार पडावा, यासाठी प्रशासन, महानगरपालिका, पोलीस आणि गणेशोत्सव महामंडळ यांच्यात समन्वयाने काम केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.





