belgaum

बिम्स रुग्णालयाच्या विकासासाठी २०० कोटींची तरतूद!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरातील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. बेळगावच्या बिम्स रुग्णालयाच्या विकासासाठी सुमारे २०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ४५० कोटी रुपयांचा उड्डाणपूल प्रकल्पही पुढे नेण्यात येत असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी दिली.

रुक्मिणीनगर येथे ७ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी युवा नेते अमान सैत उपस्थित होते. या निधीतून डांबरी रस्ते, काँक्रीट रस्ते, गटारी आणि ड्रेनेजची कामे हाती घेण्यात आली आहेत. परिसरातील नागरी समस्या सोडवून मूलभूत सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने ही कामे करण्यात येत आहेत.

यावेळी आमदार राजू सेठ यांनी शहरात विविध निधींच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. सीएमसी विशेष निधीतून ७५ कोटी रुपये, अल्पसंख्याक निधीतून ५० कोटी रुपये आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून २० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

बिम्स रुग्णालयात सुपर स्पेशालिटीसह विविध सुविधा

बिम्स रुग्णालयाच्या विकासासाठी सुमारे २०० कोटी रुपये उपलब्ध झाले असून, यामध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय, आपत्कालीन उपचार सुविधा, महिला व बाल रुग्णालय आणि भाजलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. या सुविधांमुळे बेळगावसह परिसरातील रुग्णांना प्रगत आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

तसेच किडवाई मेमोरियलच्या परिसरातील विकासकामांसाठी सुमारे ४० कोटी रुपये मंजूर झाल्याचेही आमदार राजू सेठ यांनी सांगितले. आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सुविधांच्या विकासासाठी प्रस्तावित असलेले हे प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास बेळगावच्या नागरी पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.