बेळगाव लाईव्ह: शहरातील बसवेश्वर रेल्वे ओव्हरब्रिजजवळील डेक्कन हॉस्पिटलसमोरील न्यू गुड्स शेड रोडच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी करत शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून, L&T कंपनीच्या कामानंतर रस्त्याची समस्या अधिक गंभीर झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात केवळ तात्पुरत्या स्वरूपात खडी किंवा स्टोन डस्ट टाकण्यात येते. मात्र, रस्त्यावर वर्षभर मोठमोठे खड्डे कायम राहत असल्याने नागरिकांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे.
विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास
हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आणि जवळचा मार्ग आहे. शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, रुग्णवाहिका, रुग्ण तसेच दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. खड्ड्यांमुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ अपघात होऊन दुखापत झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशावर चिखलाचे पाणी उडते. याशिवाय रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी, धुळीचे प्रदूषण आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
दोन्ही बाजूंना गटारांची मागणी
बसवेश्वर रेल्वे ओव्हरब्रिजवरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर येते. त्यामुळे रस्त्याची अवस्था आणखी खराब होते. त्यामुळे केवळ रस्त्याची डागडुजी न करता दोन्ही बाजूंना योग्य गटारांची व्यवस्था करून पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यापूर्वीही महापालिकेकडे निवेदन
या समस्येबाबत १० जून २०२६ आणि पुन्हा ३ जुलै २०२६ रोजी बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठीही महत्त्वाचा मार्ग
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे महत्त्व आणखी वाढते. शाहापूर तसेच बेळगाव शहराच्या उत्तरेकडील भागातील गणेश विसर्जन मिरवणुकीची वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात.
कपिलेश्वर विसर्जन तलावाची क्षमता पूर्ण झाल्यास अनेक गणेश विसर्जन मिरवणूक वाहने इंद्रप्रस्थनगर, मराठा मंदिर कार्यालयाजवळील रामतीर्थ विसर्जन तलावाकडे वळविली जातात. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीपूर्वी हा रस्ता सुरक्षित आणि वाहतुकीस योग्य करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
निवेदनात, मागील दोन गणेशोत्सवांच्या काळातही जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना या रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आश्वासनांनंतरही अद्याप कायमस्वरूपी काम झाले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
पावसाचा जोर वाढण्यापूर्वी रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती, योग्य ड्रेनेज व्यवस्था आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांच्यासह विकास कलघटगी शास्त्रीनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





