बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात सुमारे २८ हजार भटके कुत्रे असून, नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास पुढील एका वर्षात या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केला.
भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात संबंधित प्रतिनिधींना प्रशासनाने आतापर्यंत तीन वेळा बैठकीसाठी बोलावले आहे. प्रशासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी असून, नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाद्य देणे टाळावे
घराच्या बाहेर, इतरांच्या घरासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्य देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. प्रशासनाकडून कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी निश्चित ठिकाणे (Designated Points) उपलब्ध करून दिली जाणार असून, नागरिकांनी त्याच ठिकाणी खाद्य द्यावे.
पार्क, मैदाने आणि इतर सार्वजनिक जागांमध्ये कुत्र्यांना खाद्य देणे टाळावे. या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. अशा परिस्थितीत केवळ शांत स्वभावाचे कुत्रेच तेथे येतील असे नाही, तर आक्रमक कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.
आक्रमक कुत्र्यांसाठी टप्प्याटप्प्याने शेल्टरची व्यवस्था
सर्व आक्रमक कुत्र्यांना एकाच वेळी पकडून हलवणे शक्य नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आक्रमक कुत्र्यांसाठी शेल्टर होमची व्यवस्था करावी लागणार आहे. मात्र, हजारो कुत्र्यांसाठी एकाच वेळी मोठी सुविधा उभारणे व्यवहार्य नसल्याने सुरुवातीला ३०० ते ४०० कुत्र्यांच्या क्षमतेची व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने कुत्र्यांना पकडून शेल्टरमध्ये हलविण्याचे नियोजन आहे. प्रत्येक सायकलमध्ये सुमारे ३०० कुत्र्यांवर कारवाई करून पुढील दोन-तीन महिन्यांत नियोजित लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारावी
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांतून कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. काही नागरिकांनी भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन त्यांची जबाबदारी स्वीकारली, तर समस्येचे निराकरण करण्यास मोठी मदत होईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, मुख्य सचिवांचे आदेश आणि प्रशासनाचे नियोजन यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांनीही नियमांचे पालन केल्यास भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर निश्चितच तोडगा काढता येईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.





