बेळगाव लाईव्ह : ‘बॉर्डर’, ‘घायल’, ‘रिफ्युजी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे आणि ‘सुराग : द क्लू’ मालिकेतील इन्स्पेक्टर भारत या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते सुदेश बेरी पुन्हा एकदा बेळगावमध्ये आले होते. त्यानिमित्ताने ‘बेला’ संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात १३० शिक्षकांचा गौरव केल्यानंतर ‘बेळगाव लाईव्ह’चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनी विशेष संवाद साधला. त्यावेळी
बेळगावला आपण यापूर्वीही आलो असल्याचे सुदेश बेरी यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी मित्राच्या लग्नासाठी बेळगावला आलो होतो, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
‘मला वाटतं, मी याच शहरांसाठी बनलोय!’
मोठ्या शहरांपेक्षा बेळगावसारख्या शहरांमध्ये येताना आपल्याला वेगळाच आनंद मिळतो, असे सुदेश बेरी म्हणाले.
मोठ्या शहरांमधील गर्दी, अस्वच्छता आणि सततची धावपळ आपल्याला अस्वस्थ करते. त्याउलट बेळगावसारख्या शहरात आल्यानंतर मनाला एक वेगळे समाधान मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
“मला असं वाटतं की मी याच शहरासाठी बनलो आहे. मला मोठ्या शहरांमध्ये सफोकेशन होते. स्वच्छ गोष्टी मला आवडतात आणि म्हणूनच अशा शहरांमध्ये आल्यावर मला खूप चांगलं वाटतं,” असे बेरी यांनी सांगितले.
इन्स्पेक्टर भारत आजही प्रेक्षकांच्या मनात
१९९६ मध्ये ‘सुराग : द क्लू’ या मालिकेतील इन्स्पेक्टर भारत या भूमिकेने सुदेश बेरी यांना देशभर लोकप्रियता मिळवून दिली. या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी निर्माती कुमुद चौधरी यांचे विशेष कौतुक केले.
“कुमुद चौधरी माझ्यावर प्रेम करत होत्या. जेव्हा एखादा मेकर आपल्या अभिनेत्यावर प्रेम करतो, तेव्हा त्यातून चांगली गोष्ट निर्माण होते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चित्रपट किंवा मालिकेचे यश हे केवळ कलाकाराच्या हातात नसते. अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात; त्यामुळेच काही कलाकृती ‘बनतात’, असे त्यांनी सांगितले.
सनी देओल माझे मेंटर; धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद
सुदेश बेरी यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे टप्पे म्हणजे सनी देओल, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळालेला सहवास.
‘घायल’मध्ये सनी देओल यांच्यासोबत, ‘बॉर्डर’मध्ये लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आणि ‘रिफ्युजी’मध्ये खलनायकी भूमिकेत त्यांनी काम केले.
याबाबत बोलताना त्यांनी सनी देओल यांना आपला मेंटॉर असल्याचे सांगितले.
“सनी देओल यांनी मला लॉन्च केलं. ते माझे मेंटर आहेत. धर्मजींचा आणि अमिताभ बच्चनजींचा आशीर्वाद मला मिळाला. एवढ्या मोठ्या दिग्गजांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर सुदेश बेरीला कोण हलवू शकतं?” असे म्हणत त्यांनी आपल्या कारकिर्दीतील या आठवणींना उजाळा दिला.

शिक्षकांना दिला राष्ट्रनिर्माणाचा संदेश
बेळगावमध्ये १३० शिक्षकांचा सन्मान केल्यानंतर सुदेश बेरी यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश दिला.
“तुम्ही ज्या देशात राहता, त्या देशाची, त्या देशाच्या मातीची आणि परंपरेची इज्जत करा,” असे आवाहन त्यांनी केले.
आपली संस्कृती आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठांच्या परंपरा आणि वारसा विसरू नका, असा संदेश त्यांनी दिला.
मोदींवरील वक्तव्यावर टीकाकारांना उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुदेश बेरी अलीकडे चर्चेत आले होते. मोदींना विष्णूच्या अवतारासमान संबोधल्याच्या वक्तव्यावरून झालेल्या टीकेबाबत विचारले असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
“चैन से सोना है तो अब जाग जाओ…” अशी सुरुवात करत त्यांनी,
“हमें चिंता नहीं उसकी, उसे चिंता हमारी है, हमारी नाव का माझी वही सुदर्शन चक्रधारी है,” असे म्हटले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे मुलाखतीतील हा भाग विशेष चर्चेचा ठरला.
आणि शेवटी… ‘सुराग : द क्लू’चा तोच दमदार डायलॉग!
बेळगावकरांसाठी इन्स्पेक्टर भारतचा एक डायलॉग सांगण्याची विनंती केल्यानंतर सुदेश बेरी यांनी तब्बल तीन दशकांनंतरही चाहत्यांच्या लक्षात असलेला संवाद आपल्या खास अंदाजात सादर केला—
“मुजरिम अपने आपको कितना ही होशियार, कितना ही चालाक क्यों न समझे, वो कोई न कोई निशानी, कोई न कोई सुराग जरूर छोड़ जाता है…”
आणि त्यानंतर “सीआयडी ऑफिसर विधान कानून का ही दूसरा नाम है,” या संवादाने त्यांनी मुलाखतीचा शेवट केला.
अभिनयाच्या पडद्यावरचा ‘इन्स्पेक्टर भारत’ असो किंवा बेळगावच्या शिक्षकांशी साधलेला मनमोकळा संवाद—सुदेश बेरी यांच्या या बेळगाव भेटीत त्यांच्या कारकिर्दीच्या आठवणी, शहराविषयीचे प्रेम आणि सामाजिक-सांस्कृतिक विचार अशा तिन्ही बाजू ठळकपणे समोर आल्या.





