बेळगाव लाईव्ह : पापणीच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला येणारी छोटी गाठ, सूज, ठणका किंवा पस याकडे अनेकदा किरकोळ समस्या म्हणून पाहिले जाते. मात्र, ही समस्या वारंवार होत असल्यास योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
‘स्टाय’ला वैद्यकीय भाषेत Hordeolum असे म्हटले जाते, तर काही पापणीच्या गाठींना Chalazion असे संबोधले जाते. बेळगाव परिसरात याला ‘आंधोळी’, ‘रांजणवाडी’ किंवा ‘चिटली’ अशा नावांनीही ओळखले जाते.
डॉ. सोनाली सरनोबत यांच्या माहितीनुसार, या समस्येमध्ये पापणीवर गाठ येणे, सूज, बारीक ठणका, डोळ्यातून पाणी येणे आणि काही वेळा पस येणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही व्यक्तींमध्ये ही समस्या वारंवार उद्भवते आणि एका गाठीच्या उपचारानंतर दुसऱ्या ठिकाणी पुन्हा गाठ येऊ शकते.

सामान्यतः डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केले जातात. मात्र, वारंवार ‘स्टाय’ होत असल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी नेत्रतज्ज्ञ किंवा संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
डोळ्यांची समस्या दीर्घकाळ राहू नये आणि पुढील गुंतागुंत टाळता यावी, यासाठी लक्षणे कायम राहिल्यास किंवा वारंवार गाठ येत असल्यास वेळेत तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आरोग्य टिप्स : डोळ्यांवरील गाठ वारंवार होत असेल, तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्या.





