belgaum

महापालिकेच्या या कारभारावर भाविकांचा संताप

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गोकुळाष्टमीच्या पारंपरिक उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. बेळगाव शहरात नदी नसल्याने दरवर्षी कपिलेश्वर तलावात गोकुळाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र यंदा कपिलेश्वर तलावात विसर्जनासाठी पुरेसे पाणीच उपलब्ध नसल्याने भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

गोकुळाष्टमीच्या रात्री बारा वाजता पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून भाविकांनी गोकुळाच्या मूर्ती विसर्जनासाठी कपिलेश्वर तलावाकडे गर्दी केली. मात्र तलावात एक फुटापेक्षाही कमी, अवघे ७ ते ८ इंच पाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भाविकांना नाईलाजाने याच कमी पाण्यात मूर्तींचे विसर्जन करावे लागले.

दरवर्षी विसर्जनासाठी या ठिकाणी पुरेसे पाणी असते. त्यामुळे यंदा महापालिका प्रशासनाने विसर्जनापूर्वी पाण्याची व्यवस्था का केली नाही, असा सवाल उपस्थित भाविकांकडून करण्यात आला. महापालिकेचे कर्मचारी तसेच संबंधित नगरसेवकांनी या परिस्थितीची वेळीच दखल घेणे अपेक्षित होते, अशी नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली.

 belgaum

दरम्यान, परिस्थितीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, रामराज दरवंदकर आणि माजी नगरसेवक राजू बिरजे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती त्यांनी दिली.

गोकुळाष्टमीसारख्या पारंपरिक धार्मिक उत्सवासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक सहभागी होत असताना, विसर्जनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात न आल्याने महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भविष्यात अशा धार्मिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विसर्जनस्थळी आवश्यक पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची योग्य वेळी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.