बेळगाव लाईव्ह :खानापूर जामगावहून खानापूरकडे येणाऱ्या बसच्या स्टेअरिंगचा जॉइंट रस्त्यावरील खड्ड्यात बस आदळल्याने अचानक तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्ता सोडून चालकाच्या बाजूला असलेल्या उतारावरून खाली उतरली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने बसवर नियंत्रण मिळवून ती थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
ही घटना रविवारी (६ सप्टेंबर) सकाळी सुमारे १०.३० वाजता शिरोली नाका ते तेरेगाळी क्रॉसदरम्यानच्या रस्त्यावर घडली.
जामगावहून खानापूरकडे बस येत असताना या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने चालक बस सावकाश चालवत होता. याचदरम्यान बस एका खड्ड्यात आदळली. त्यावेळी स्टेअरिंगचा जॉइंट तुटल्याने बस अचानक चालकाच्या बाजूला वळली आणि रस्ता सोडून खाली उतरली.
बसचा वेग कमी असल्याने चालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने बस थांबविली. त्यामुळे बस पुढे जंगलातील झाडांवर आदळण्यापासून बचावली. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले.
रस्त्यावरील खड्ड्यांबाबत नागरिकांमध्ये संताप
या मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली आहे. सर्वपक्षीय बैठकीत सामाजिक कार्यकर्ते नारायण काटगाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय गस्ती यांच्याकडे शिरोली परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक आणखी वाढणार आहे. बेळगाव, गोवा तसेच खानापूर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खानापूर-हेमाडगा मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक आणि प्रवासी वर्गातून होत आहे.
“आज चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. प्रशासनाने आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.





