बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात गेल्या दोन दशकांपासून मटका आणि ओसीचा अवैध व्यवसाय चालवणाऱ्या एका कुख्यात मटका बुकीला पोलीस प्रशासनाने शहरातून तडीपार केले आहे.
संशयित आरोपी महंमदशफी मोईद्दीनसाब तहसीलदार (वय ६९, रा. खंजर गल्ली, बेळगाव) हा २००३ पासून मटका जुगार चालवून सर्वसामान्य आणि गरीब लोकांना आर्थिक खाईत लोटत होता.
त्याच्याविरोधात बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत तब्बल ८२ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४९ प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
याशिवाय पोलिसांनी सीआरपीसी/बीएनएसएस कायद्यांतर्गत १२ प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या होत्या आणि त्याच्याकडून लिहून घेतलेले ५० हजार रुपयांचे जामीन बॉण्डही जप्त केले होते.

सतत कारवाया होऊनही आरोपीच्या वर्तनात सुधारणा झाली नाही आणि तो समाजात अशांतता निर्माण करत गुन्हेगारी कारवाया करत राहिल्याने, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपआयुक्तांनी (DCP) कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ५५(बी) अंतर्गत १३ ऑगस्ट २०२६ रोजी त्याला बेळगाव शहरातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
अशा कोणत्याही बेकायदेशीर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





