belgaum

नोव्हेंबरपर्यंत संकम हॉटेल–राणी चन्नम्मा चौक फ्लायओव्हरचे काम सुरू होणार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बेळगाव शहरासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. संकम हॉटेलपासून अशोक चौक मार्गे राणी चन्नम्मा चौकापर्यंत फ्लायओव्हर उभारण्याचे काम नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव केला. कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा, गंगाधरराव देशपांडे यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे त्यांनी स्मरण केले.

राज्य सरकारने सामाजिक न्याय आणि समानतेच्या आधारावर अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्याचेही त्यांनी सांगितले. शक्ती, अन्नभाग्य, गृहज्योती, गृहलक्ष्मी आणि युवानिधी या पाच हमी योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

 belgaum

बेळगावसाठी फ्लायओव्हरची महत्त्वाची घोषणा

शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता संगम हॉटेलपासून अशोक चौक मार्गे राणी चन्नम्मा चौकापर्यंत फ्लायओव्हर उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचे काम नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले.

या फ्लायओव्हरचा दुसरा टप्पाही पुढील काही वर्षांत हाती घेण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या प्रकल्पाकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

जिल्ह्यात १,४६१ बसची दररोज वाहतूक

शक्ती योजनेबाबत माहिती देताना जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात बेळगाव, चिक्कोडी आणि धारवाड या तीन विभागांतर्गत १६ बस आगारांमधून बससेवा चालवली जाते. या १६ आगारांतून दररोज एकूण १,४६१ बस धावत असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ‘प्रजासेवा’ विभाग सुरू करण्यात आला असून, सरकारला जनतेच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही जारकीहोळी यांनी नमूद केले.

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून बेळगाव शहरातील फ्लायओव्हर प्रकल्पाबाबत केलेली घोषणा ही शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.