बेळगाव लाईव्ह : बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव महापालिकेत मंजूर करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नसून, हा विषय टाळण्यासाठीच जाणीवपूर्वक सभा घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सतीश जारकीहोळी यांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. महापालिकेची सभा गेल्या तीन महिन्यांपासून झालेली नाही. त्यामुळे या विषयावर महापालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे ते म्हणाले.
“महापालिका प्रशासनाला सभा घेण्याची इच्छा नाही. जाणीवपूर्वक सभा घेतली जात नसल्याचा संशय आहे,” असा आरोप जारकीहोळी यांनी केला.
बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव मंजूर करण्याच्या मागणीचा मुद्दा संवेदनशील मानला जात आहे. त्यामुळे या विषयावर महापालिकेत चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना सभा न घेण्यामागे नेमके कारण काय, यावर माध्यमांनी प्रकाश टाकावा, असे आवाहनही जारकीहोळी यांनी केले.

१०० दिवसांत १० महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य
दरम्यान, नव्या मुख्यमंत्र्यांनी सरकारला १०० दिवसांचे लक्ष्य दिले असून, १० प्रमुख कामे पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ही कामे १०० दिवसांच्या आत पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
राज्यात नव्याने ‘प्रजासेवा’ विभाग सुरू करण्यात येत आहे. या विभागासाठी अद्याप मंत्र्याची नियुक्ती झालेली नाही. अनेक खात्यांचे वाटपही बाकी असून, वेळ देऊ शकणाऱ्या व्यक्तीकडे प्रजासेवा विभागाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला मंत्रिपदासाठी तीन नावांची चर्चा
महिला मंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत संबंधित खाते मुख्यमंत्री सांभाळत आहेत. महिला मंत्र्यांच्या निवडीबाबत काही संभ्रम असला तरी राज्यातील सर्व महिला आमदार सक्षम आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर, उमाश्री आणि गायत्री यांच्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले.
अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. कोणाला मंत्रिपद मिळाले तरी त्यांच्या पाठीशी राहून काम करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जमीर अहमद यांच्या ध्वजारोहणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
मंत्री जमीर अहमद यांनी ध्वजारोहण करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरही सतीश जारकीहोळी यांनी भाष्य केले. या विषयाचा पत्रात उल्लेख करण्यात आला असून, बीबीएमपी निवडणुकीचाही त्यात संदर्भ आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत जमीर अहमद यांनाच विचारावे, असे त्यांनी सांगितले.
भाजपकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवर टीका करताना भाजपला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे जारकीहोळी म्हणाले. गेल्या ७० वर्षांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
उद्या तीन तालुक्यांत दुष्काळ पाहणी
येरगट्टी, सौंदत्ती आणि रामदुर्ग या तीन तालुक्यांमध्ये उद्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. सध्या या तीन तालुक्यांमध्येच दुष्काळाची समस्या असल्याचे सांगत, पाहणीनंतर केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला जाईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले.
यावेळी आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन उपस्थित होते.





