बेळगाव लाईव्ह :महात्मा फुले रोड आणि शहापूरकडून येणाऱ्या वाहन चालकांना गोंधळात टाकणाऱ्या गोवावेस अर्थात बसवेश्वर सर्कल येथील सिग्नल बाबत बेळगाव लाईव्हने आज प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची रहदारी पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
सदोष सिग्नल संदर्भात रहदारी दक्षिण विभागाच्या पोलीस निरीक्षकांनी आज स्वतः गोवावेस सर्कल येऊन पाहणी केली आहे. आता स्मार्ट सिटीचे अभियंता, स्थानिक नगरसेवक वगैरेंच्या सहकार्याने येत्या सोमवारपूर्वी सिग्नलची समस्या निकालात काढली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गोवावेस येथील सिग्नल बाबत अनेकांनी बेळगाव लाईव्हला फोन करून तक्रार करताना महात्मा फुले रोड आणि शहापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी कसे चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आले आहेत आणि त्यामुळे कसा गोंधळ उडवून अपघाताची शक्यता कशी निर्माण होत आहे याची माहिती दिली होती.
त्यानुसार बेळगाव लाईव्हने सिग्नलचे वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर वृत्ताची पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गोवावेस अर्थात बसवेश्वर सर्कल येथील संबंधित सिग्नल ठिकठाक व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते बेळगाव लाईव्हची प्रशंसा करत आहेत.