belgaum

खानापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थिनींचा घरोघरी जाऊन सत्कार

0
331
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने यावर्षी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत खानापूर तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लक्षणीय यश संपादन केले आहे. झुंजवाड येथील दिव्या प्रदीप देसाई हिने 625 पैकी 624 गुण मिळवून राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दिव्याने इंग्रजी विषयाचा पेपर पुनर्मूल्यांकनासाठी पाठवला असून त्या विषयातही गुण वाढून पूर्ण 625 गुण मिळण्याचा विश्वास तिने व्यक्त केला.

त्याच झुंजवाड गावातील आनंदगड विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी माया मंजुनाथ धबाले हिनेही प्रथम क्रमांक मिळवला. हलशीवाडी येथील कुमारी अनुष्का रघुनाथ देसाई हिने 625 पैकी 621 गुण मिळवून विशेष श्रेणीत यश संपादन केले. तसेच ज्येष्ठ नेते संभाजी देसाई (कापोली) यांची नात कुमारी राजलक्ष्मी हनुमंत देसाई हिने नंदगड येथील एक्झिलियन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 97 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालित कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी साक्षी कृष्णा बिडकर हिनेही उल्लेखनीय यश मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

 belgaum

या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सूर्याजी सदैव पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी माजी तालुका पंचायत अध्यक्ष सुरेशराव देसाई, समितीचे ज्येष्ठ नेते तथा नंदगड दक्षिण पीकेपीएसचे अध्यक्ष पी.एच. पाटील, तसेच समितीचे सचिव राजू पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांना भेटून अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अभिमानास्पद बाब म्हणजे या सर्व विद्यार्थिनी मराठी भाषिक सीमा भागातील असूनही त्यांनी कन्नड व इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत अत्यंत मेहनतीने हे यश संपादन केले आहे. याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीने विशेष अभिमान व्यक्त केला.

यावेळी अध्यक्ष सूर्याजी सदैव पाटील यांनी विद्यार्थिनींना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर सुरेशराव देसाई यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना, पुढील शिक्षण घेत असताना मराठी भाषेबद्दल स्वाभिमान व अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. तसेच इतर भाषांमध्ये शिक्षण घेत असतानाही आपल्या मातृभाषेचा, परंपरा व संस्कृतीचा सन्मान राखत स्वतःच्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी गुणवंत विद्यार्थिनींचे पालक व समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.