बेळगाव लाईव्ह : वडगाव येथील अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
अवघ्या सात दिवसांच्या नवजात चिमुकलीच्या जीवासाठी तातडीने सात रक्तदात्यांची गरज निर्माण होताच मंडळाचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले.
मंडळाचे अध्यक्ष बाळू गोरल यांना गोव्यातील एका कुटुंबाकडून तातडीचा फोन आला. त्यांच्या सात दिवसांच्या मुलीवर शस्त्रक्रिया होणार होती आणि त्यासाठी O+ रक्तगटाच्या सात रक्तदात्यांची तातडीने आवश्यकता होती. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समजताच बाळू गोरल यांनी वेळ न दवडता मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.

सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांच्या सहकार्याने अवघ्या काही वेळात सात रक्तदाते तयार झाले. सर्वांनी तत्काळ रक्तदान करून त्या चिमुकलीच्या उपचारासाठी अमूल्य मदत केली. त्यांच्या या वेळेवरच्या मदतीमुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाचे हे कार्य केवळ रक्तदानापुरते मर्यादित नसून, संकटाच्या काळात समाजासाठी धावून जाण्याची भावना किती महत्त्वाची आहे, याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून कार्यकर्त्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




