बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आपला विस्तार करण्यासाठी फ्रेंच धातू निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ऑबर्ट अँड डुव्हाल’ उत्सुक आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मोठे व मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी पॅट्रिक रेमिल यांच्याशी चर्चा केली.
एएक्युस कंपनीसोबत असलेल्या भागीदारीच्या आधारे बेळगावमधील ‘एएक्युस एरोस्पेस सेझ’मध्ये ऑबर्ट अँड डुव्हाल आपले उत्पादन नेटवर्क वाढवण्यावर भर देत आहे. कंपनी २०१३ पासून स्क्वॉड च्या माध्यमातून बेळगावच्या एरोस्पेस निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.
स्क्वॉड कंपनी १५०० टन आणि १०००० टनांच्या अत्याधुनिक फोर्जिंग प्रेसद्वारे ॲल्युमिनियम, स्टील, टायटॅशियम आणि निकेल मिश्र धातुंचे एरोस्पेस घटक तयार करते. ऑबर्ट अँड डुव्हाल ही कंपनी प्रमुख विमान उत्पादकांच्या पुरवठा साखळीला मोठे सहकार्य पुरवते.

जुलै २०२६ पासून एअरबस (Airbus) आणि सफ्रान (Safran) या जागतिक कंपन्यांची ऑबर्ट अँड डुव्हालमध्ये समान भागीदारी झाली आहे. एरोस्पेस, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात युरोपमधील आघाडीची धातू निर्मिती कंपनी बनण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
बेळगावमधील या संभाव्य विस्तारामुळे शहराचे एरोस्पेस आणि संरक्षण पुरवठा साखळीतील स्थान अधिक मजबूत होणार आहे. मात्र, या विस्तारासाठी लागणारी संभाव्य गुंतवणूक आणि कालमर्यादा याबाबत मंत्र्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.





