बेळगाव लाईव्ह: गणेशोत्सवाची तयारी आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी चाललेल्या एका तरुणाचा बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगावातील अनगोळ नाक्याजवळ घडली आहे.
सुनील पाटील (वय २५, रा. बोरगाव, तालुका निपाणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कामानिमित्त अनगोळ येथे वास्तव्यास होता.
गणपती मूर्तीच्या सजावटीकरिता सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी तो दुचाकीवरून निघाला होता.अनगोळ नाक्याजवळ आल्यानंतर दुचाकी आणि समोरून येणाऱ्या बसची समोरासमोर भीषण धडक झाली. हा अपघात इतका भयानक होता की सुनीलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कॅम्प रहदारी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे बोरगाव व अनगोळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





