बेळगाव लाईव्ह: ईडीच्या छापेमारीनंतर कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. “ईडीच्या छाप्याबाबत मला आधी नोटीस दिली असती तरी झाले असते. मात्र, यात राजकारण आहे का, असा वास येत आहे. हा विषय आता चर्चेचा ठरला आहे,” असे जारकीहोळी यांनी म्हटले.
गुरुवारी बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती दिली. “सुमारे एक ते दोन कोटी रुपये रोख रक्कम मिळाली आहे. ती आमचीच आहे. ती परत मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आम्ही सादर करू. काही कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर त्याला उत्तर देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास दिला नसल्याचेही जारकीहोळी यांनी सांगितले. “दुपारी विश्रांती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी शांतपणे उत्तरे दिली. सध्या ही तपासाची प्राथमिक अवस्था आहे. ईडी पुढे कोणत्या दिशेने तपास करते, हे पाहावे लागेल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आमच्या नेत्यांनाच लक्ष्य केले जात आहे. शेवटी ही कारवाई आमच्यापर्यंत येऊ शकते, अशी अपेक्षा होती; मात्र, एवढ्या लवकर माझ्यावर कारवाई होईल असे वाटले नव्हते,” असे जारकीहोळी म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या माहितीनुसार आणखी आठ नेते ईडीच्या यादीत असल्याचा दावाही त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाबाबत लवकरच मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. त्यानंतर ते बेळगावला रवाना होणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनीही सतीश जारकीहोळी यांच्या व्यावसायिक व्यवहारांची चौकशी झाल्यास ते आवश्यक ती उत्तरे देतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईनंतर कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.





