बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील विविध पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात जप्त केलेले तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे गांजा, हेरॉईन, हशिश वगैरे अंमली पदार्थ काल गुरुवारी वैज्ञानिक पद्धतीने नियमानुसार नष्ट करण्यात आले.
बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील विविध पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी केलेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईमध्ये पुढील प्रमाणे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
त्यामध्ये एकूण 15 प्रकरणातील सुमारे 10,76,500 रुपये किमतीचा एकूण 24 किलो 13 ग्रॅम व 45 मिलीग्रॅम गांजा, एकूण 8 प्रकरणातील सुमारे 8,02,400 किमतीचे 120 ग्रॅम व 83 मिलिग्रॅम हेरॉईन, एका प्रकरणात 39,00,000 रुपये किमतीचे 13 किलो आणि 945 ग्रॅम हशिश, त्याचप्रमाणे सुमारे 38 किलो 197 ग्रॅम व 28 मिलिग्रॅम इतर अंमली पदार्थ व निद्राजनक वस्तूंचा समावेश होता.

ज्यांची एकूण किंमत 1 कोटी 15 लाख 57 हजार 800 रुपये इतकी होते. अंमली पदार्थांचा हा सर्व साठा काल गुरुवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन , गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्यासह संबंधित अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सौंदत्ती तालुक्यातील हारूगोप्प येथील दि बेळगाव ग्रीन इन्व्हिराॅनमेंटल मॅनेजमेंट प्रा. लि. या कारखान्याच्या चिमणीमध्ये वैज्ञानिक पद्धतीने नियमानुसार जाळून नष्ट करण्यात आला.




