बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील कुमारस्वामी लेआउट येथे चोरीचा प्रयत्न झाला असून एका घरासमोर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या चौघा चोरट्यांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. चोरट्यांच्या या वावरामुळे लेआउट मधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बेळगाव शहरातील कुमारस्वामी लेआउटमध्ये आज रविवारी पहाटे 3:36 वाजता चोरट्यांची एक टोळी दाखल झाली. चोरट्या पावलांनी वावरणारे हे चौघे चोरटे घराच्या आवार भिंती मागे दडून घरांचे निरीक्षण करत असल्याचे दृश्य एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
त्यामध्ये चोरट्यांच्या अपरिचित वावराचा अंदाज आल्यामुळे कांही घरातील कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाजही ऐकू येतो. यावरून चोरी करण्याच्या उद्देशाने आलेली ही चोरट्यांची टोळी आपला उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येक घरांचा अंदाज घेत असल्याचे दिसून येत होते.
सदर प्रकार आपल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास येताच संबंधित घर मालकाने त्याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
चोरट्यांच्या या वावरामुळे सध्या कुमारस्वामी लेआउट मधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आपल्या भागात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.




