belgaum

20 दुचाकी जप्त तिघे अटकेत

0
297
 belgaum

बेळगाव लाईव्ह :एका मोटरसायकल चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावताना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काल तिघाजणांना अटक केली असून त्यांच्या जवळील 11,73,000 रुपये किमतीच्या एकूण 20 मोटरसायकली जप्त केल्या आहेत.


पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे फकीरप्पा सिद्धप्पा करीगार (वय 25, रा. हिरेहट्टी, ता. गोकाक जि. बेळगाव), रमेश प्रभू पाटील (वय 23, रा. आलदाळ, ता. हुक्केरी जि. बेळगाव) आणि कमलप्पा उर्फ कमलु यल्लाप्पा गुंड्यागोल (वय 38, रा. केंचनट्टी, मार्कंडेयनगर ता. बेळगाव) अशी आहेत.


या प्रकरणाची माहिती अशी की, होनगा (ता. बेळगाव) येथील दिलीप तुकाराम जाधव यांनी त्यांची मोटरसायकल (क्र. केए 22 ईवाय 6688) येळ्ळूर येथून चोरीला गेल्याची तक्रार गेल्या 23 एप्रिल 2026 रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली होती.


या चोरीचा छडा लावण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (कायदा -सुव्यवस्था) पोलीस उपायुक्त (गुन्हे -वाहतूक) आणि बेळगाव ग्रामीण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौड्र यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापण्यात आले होते. या पोलीस पथकाने मोटरसायकल चोरीचा तपास करत असताना संशयावरून उपरोक्त तिघा आरोपींना काल शनिवारी ताब्यात घेतले.


त्यावेळी पोलीस चौकशीत आरोपींनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळ्ळूर, मार्कंडेयनगर, टिळकवाडी व शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक, हुक्केरी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये एक, तसेच अन्य विविध ठिकाणी 15 दुचाकी वाहनांची चोरी केल्याची कबुली दिली. तेंव्हा पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडील यामाहा, हिरो स्प्लेंडर, टीव्हीएस, सुझुकी वगैरे विविध कंपन्यांच्या सुमारे 11 लाख 73 हजार रुपये किमतीच्या एकूण 20 मोटरसायकली जप्त केल्या.


याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. मोटरसायकल चोरी प्रकरणाचा यशस्वी छडा लावल्याबद्दल शहर पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.