belgaum

अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित ‘आमदार अनिल बेनके करंडक -2023’ भव्य अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासह 5 लाख रुपयांचे बक्षीस बलाढ्य मोहन मोरे इलेव्हन संघाने हस्तगत केले आहे. स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात मोहन मोरे इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी झेन स्पोर्ट्स (मुंबई) संघावर 5.4 षटकांसह तब्बल 10 गडी राखून एकतर्फी दणदणीत विजय मिळविला.

bg

शहरातील सरदार्स मैदानावर गेल्या 13 दिवसापासून सुरू असलेल्या आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची आज क्रिकेटप्रेमींच्या अलोट प्रतिसादात यशस्वी सांगता झाली. या स्पर्धेतील प्रतिष्ठेचा ‘मालिकावीर’ पुरस्कार स्पर्धेत सातत्याने भक्कम फलंदाजी करून दोन अर्धशतके झळकवणारा मोहन मोरे इलेव्हन संघाचा स्टार फलंदाज करण मोरे यांने पटकाविला. त्याला रॉयल इन्फिल्ड ही भारदस्त मोटरसायकल बक्षीस दाखल देऊन गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे स्पर्धेतील ‘उत्कृष्ट फलंदाज’ हा पुरस्कार मुन्ना शेख (झेन स्पोर्ट्स) आणि ‘उत्कृष्ट गोलंदाज’ हा पुरस्कार प्रज्योत अंबिरे (मोरे इलेव्हन) याने मिळविला. त्याचप्रमाणे ‘उत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ पुरस्काराचा मानकरी प्रसाद शिरवलकर हा ठरला.More cricket

स्पर्धेचा मोहन मोरे इलेव्हन आणि झेन स्पोर्ट्स (मुंबई) यांच्यातील आजचा अंतिम सामना दोन डावांचा खेळविण्यात आला. सकाळी नाणेफेक जिंकून मोहन मोरे इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परिणामी प्रथम फलंदाजी करताना झेन स्पोर्ट्स संघाने मर्यादित 12 षटकात 6 गडी बाद 133 धावा काढल्या. त्यांच्या प्रथमेश पवार (43 धावा) व मुन्ना शेख (25 धावा) यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यास मदत केली.

मोरे संघातर्फे प्रज्योत अंबिरे (34 /2) व गणेश धिटे (33 /2) यांनी यशस्वी गोलंदाजी केली. प्रत्युत्तरा दाखल मोहन मोरे इलेव्हन संघाने मर्यादित 12 षटकात 4 गडी बाद 171 धावा काढून पहिल्या डावात 38 धावांची आघाडी घेतली. त्यांच्या फरदीन काझी (18 चेंडू 50 धावा), करण मोरे (23 चेंडूत 50 धावा) आणि मंगेश वैत (17 चेंडूत 32 धावा) यांनी शैलीदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. झेन संघाच्या बिलाल (ज्यु.) व प्रभू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.Benke cricket

दुसऱ्या डावात झेन स्पोर्ट्स संघाने मर्यादित 12 षटकात 9 गडी बाद 110 धावा काढून मोरे इलेव्हन संघाची आघाडी मोडून काढण्याबरोबरच त्यांच्यासमोर विजयासाठी 73 धावा काढण्याचे आव्हान ठेवले. झेन स्पोर्ट्सच्या कृष्णा पवार (35 धावा) उमर खान (20 धावा) व राकेश पोलार्ड (23 धावा) यांनी चांगली फलंदाजी केली. मोहन मोरे संघातर्फे प्रज्योत अंबिरे याने भेदक गोलंदाजी करताना 23 धावात 3 गडी बाद केले. त्याला चांगली साथ देत डेझी बाबा याने 26 धावात 2 गडी बाद केले.

विजयासाठी मर्यादित 12 षटकात म्हणजे 72 चेंडूत विजयासाठी 73 धावा काढण्याचे आव्हान लीलया पेलताना मोहन मोरे इलेव्हन संघाने 6.2 षटकात एकही गडी न गमावता नाबाद 76 धावा झळकावून विजेतेपदाला गवसणी घातली. त्यांचे सलामीचे फलंदाज फरदीन काझी (6 चौ. 2 ष.सह 17 चेंडूत नाबाद 44 धावा) आणि करण मोरे (4 चौ.सह 21 चेंडूत नाबाद 28 धावा) यांनी चौफेर फटकेबाजीसह शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करताना संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

मोहन मोरे इलेव्हन संघ विजयी होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून मैदान दणाणून सोडले. अंतिम सामन्यानंतर आयोजित दिमाखदार बक्षीस वितरण समारंभात स्पर्धेचे आयोजक बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.