“बालरंगभूमी अभियान, मुंबई” या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या संत मीरा हायस्कूलमध्ये बालनाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव आणि फुलोरा बेळगाव या संस्थांच्या सहकार्यामुळे संमेलनाला रंगत येणार आहे.
सदर संमेलनासाठी बेळगाव मधील २५ ते ३० शाळांमधील प्रत्येकी १५ मुले, याप्रमाणे एकूण ३०० मुलांचा सहभाग असणार आहे. शनिवार १८ फेब्रुवारी रोजी दुपारी नाट्यदिंडीने संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. उद्घाटन समारंभ संपन्न झाला की बेळगावच्या कलाकारांनी सादर केलेली दोन बालनाट्य शिबिरार्थींसाठी सादर करण्यात येतील.
रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत बालरंगभूमी अभियानसाठी काम करणारे तज्ञ सदर तीनशे मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेतील. त्यानंतर दुपारच्या सत्रासाठी महाराष्ट्रातून राज्य नाट्य स्पर्धेला बक्षीस मिळवलेल्या चार नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. संमेलन बेळगाव येथे घेण्यामागे आयोजकांचा बेळगावच्या मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये सभाधिटपणा यावा, हा उद्देश आहे. रविवारी संध्याकाळी संमेलनाची सांगता होणार आहे.
त्याचबरोबर शिक्षक आणि पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन या तीनशे मुलांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था संमेलन स्थळी करण्यात आलेली आहे.
समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुबोध भावे, तसेच मोहन जोशी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वीणा लोकूर यांनी दिली आहे.