Friday, April 26, 2024

/

शहर आणि तालुका समितीची होणार पुनर्रचना -चिंतन बैठकीत निर्णय

 belgaum

बेळगाव शहर आणि तालुका समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला समितीच्या शहर आणि तालुका समितीत कार्य करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली नावे लेखी स्वरूपात द्यावी असे आवाहन करण्यात आले.

सीमाभागात मराठी भाषिकांबाबत होत असलेल्या अप्रिय घटना, मराठी भाषिकांना प्रशासनाकडून देण्यात येणारा दुजाभाव आणि मराठी भाषिकांची होत असलेली मुस्कटदाबी या आणि अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी तसेच काही दिवसात झालेल्या समिती गोटातील घडामोडींची चिंतन करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर समिती आणि तालुका समितीची बैठक बोलाविण्यात आली होती.

मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिज येथे बोलाविण्यात आलेल्या या बैठकीत तब्बल तीन तास चर्चा झाली. अनेक विषय, अनेक मुद्दे मांडत वादळी चर्चा करत शेकडो युवकांनी बैठकीत सहभाग घेतला. माजी आमदार संजय पाटील यांनी मराठी भाषिकांबाबत केलेले विधान तसेच लक्ष्मी निपाणीकर यांनी श्री गणेश विसर्जनादिवशीच्या कृतीबद्दल जाहीर निषेध नोंदविण्यात आला. मनपावर फडकविण्यात आलेला अनधिकृत लाल -पिवळा ध्वज याबाबतीत अद्याप प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. केवळ आश्वासनांवर मराठी भाषिकांना झुलवत ठेवलेल्या प्रशासनाविरोधात पुन्हा एकदा मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 belgaum

नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत समितीची पीछेहट झाली. या निवडणुकीत समितीला का हार पत्करावी लागली? याची कारणमीमांसा शोधण्याची गरज युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त करत शहर आणि तालुका समितीची पुनर्र्चना करण्याची आग्रही मागणी केली. या चर्चेत इच्छुक युवा कार्यकर्त्यांनी शहर समितीच्या रामलिंग खिंड गल्ली येथील कार्यालयात तसेच तालुका समितीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात शहर आणि तालुका समितीची पुनर्र्चना करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी आपल्या मनातील खडखड व्यक्त केली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर समिती अधिकृत उमेदवार ठरविते. परंतु शहर समितीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया केल्यानंतर अर्ज एकीकडे, अर्जाची छाननी दुसरीकडे आणि अधिकृत उमेदवार जाहीर करणे तिसरीकडे हे होता काम नये. समितीच्या नावावर एकाच जागी अनेक उमेदवार उभे राहतात. परंतु माघार घेण्यासाठी बॅलेट पेपरवर नाव येण्याची वाट पाहतात. बॅलेट पेपर वर नाव येण्या आधी माघार का घेतली जात नाही? नेतृत्व दुबळे नाही. परंतु गट-तटाचे राजकारण मोडीत काढून युवकांकडे सक्षम लढ्यासाठी धुरा सोपविण्याची गरज आहे. बदलत्या युगानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करून लढ्याला बळकटी द्या, असे मत महादेव पाटील यांनी व्यक्त केले.Mes meeting

यानंतर बोलताना युवा कार्यकर्ते पियुष हावळ म्हणाले, कि निवडणूक चिन्ह नसल्यामुळे निवडणुकीत अडचणी निर्माण होतात. निवडणुकीसाठी चिन्ह निश्चित करावे. चिन्ह नसल्यामुळे राष्ट्रीय पक्षांसमोर समिती मागे पडते. कमी पडते. त्यामुळे चिन्ह निश्चित करावे, असा मुद्दा हावळ यांनी मांडला.

यानंतर समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मदन बामणे बोलताना म्हणाले, कि कार्यकर्त्यांचे विचार ऐकणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांचे केवळ विचार न ऐकता त्या विचारांवर अंमलबजावणी करावी. अन्यथा विचार ऐकूनच घेऊ नयेत. नेतृत्व बदल करून प्रत्येकाला समितीत सामावून घेऊन तरुणांनाही संधी द्या अशी मागणी बामणे यांनी केली. रस्त्यावरील लढाईला नवीन नेतृत्वाची गरज असून कार्यकारिणी वाढवून नवी पदे जाहीर करा, असा सल्ला बामणे यांनी दिला.

यासह पियुष हावळ, गणेश दड्डीकर यांनी समितीचा राजकीय पक्ष म्हणून नोंद करण्याचा प्रस्ताव मांडला. भविष्यात चिन्ह घेऊन निवडणूक लढवून कायदेशीर सेल स्थापन करावा तसेच आरटीआय सेल स्थापन करून लढ्याची आणि समितीच्या रणनीतीत बदल करावा. राजकीय पक्षाप्रमाणे कार्य करून भविष्यातील निवडणुका जोमाने लढविण्याचा निर्धार करावा. तसेच एक महिन्याने पुन्हा बैठक घ्यावी, बैठकीला विलंब करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

एकंदर बैठकीचे स्वरूप, बैठकीत झालेल्या चर्चा, निर्णय, युवकांचा सहभाग, तब्बल तीन तास झालेल्या बैठकीत झालेली वादळी चर्चा आणि कार्यकर्त्यांची झालेली घुसमट ज्यापद्धतीने बैठकीत मांडण्यात आली यावरून समितीत पुन्हा एकदा नवचेतना निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहे. मध्यवर्ती कार्यकारिणीने या बैठकीतून बोध घेऊन, कार्यकर्त्यांचे विचार लक्षात घेऊन यावर कार्य करणे हि काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.