बेळगाव लाईव्ह : मच्छे येथे गणेश विसर्जनादरम्यान तलावात बुडून विश्वेश विनोद नायक या युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मच्छे नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. गणेश विसर्जनासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन मदत आणि पर्यायी विसर्जन तलावाची व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप करत मच्छे येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मच्छे गावातील मुख्य तलावात घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना ही दुर्दैवी घटना घडली. विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक एकाच ठिकाणी जमण्याची शक्यता असतानाही प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात येत होती. त्यामुळे मुख्य तलावावरील गर्दी आणि संभाव्य धोका कमी होण्यास मदत होत होती. मात्र, यंदा कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने मच्छे आणि परिसरातील मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन मुख्य तलावातच करण्यात आले. अंदाजे एक हजार किंवा त्याहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन एकाच ठिकाणी झाल्याने मोठी गर्दी झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, विसर्जनस्थळी अग्निशमन दल, प्रशिक्षित जीवरक्षक, आपत्कालीन बचाव पथक, वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिका यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तलावाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसणे आणि तलावातील खड्ड्यांसह इतर धोकादायक परिस्थितींकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.
या प्रकरणी मच्छे नगरपंचायतीच्या कारभाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
मृत युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या
दरम्यान, विश्वेश विनोद नायक यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कुटुंबातील तरुण सदस्याचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे.

त्यामुळे सरकारच्या नियमानुसार मृत युवकाच्या कुटुंबाला आर्थिक नुकसानभरपाई, आपत्ती मदत किंवा सानुग्रह अनुदान मंजूर करावे. तसेच, कुटुंबाला लागू असलेल्या इतर शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणेची चौकशी करावी आणि मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी मच्छे येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.





