बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रति एकर २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, ऊसाला प्रति टन ६ हजार रुपये दर निश्चित करावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा विविध मागण्यांसाठी अखिल कर्नाटक किसान संघाच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेत्यांनी हे निवेदन दिले. खानापूर तालुक्याच्या आसपासच्या अल्नावर आणि कित्तूरसह विविध तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असताना खानापूर तालुक्याला त्यातून वगळण्यात आल्याने सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
खानापूर तालुक्यातील पिकांची परिस्थिती आणि दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच कृषी उत्पादनांना स्थिर हमीभाव निश्चित करावा आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून प्रति एकर २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, उसाला प्रति टन ६ हजार रुपये दर निश्चित करावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय मलप्रभा नदीवर धरण बांधून सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणीही शेतकरी नेत्यांनी केली.
वीज वितरणाचे खासगीकरण थांबवून शेतकऱ्यांना दररोज सात तास त्रिफेज वीजपुरवठा करावा. खानापूर तालुक्यातील सुमारे ८३० किलोमीटर लांबीच्या खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली.
गृहलक्ष्मी, विधवा, दिव्यांग आणि वृद्धापकाळ निवृत्तीवेतनासह विविध सरकारी योजनांची प्रलंबित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
यावेळी बोलताना किशोर मिठारी यांनी खानापूर तालुक्यातील पिकांची स्थिती आणि दुष्काळाची गंभीरता सरकारच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. पुढील आठ दिवसांत खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अन्यथा ८ ऑक्टोबर रोजी लिंगनमठ क्रॉस येथे रामनगर–धारवाड आणि बेळगाव–ताळगुप्पा राज्य महामार्गांवर शेतकऱ्यांसह रात्रंदिवस धरणे सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्या माध्यमातून कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडेही हे निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अश्पाक अहमद पटेल, दयानंद गुपित, गोपाळ वीरापूर, लक्ष्मण चन्नापूर, कुतुबुद्दीन शेख, बिष्टप्पा सुंबळी, सेबास्टिन सोझ, गोपाळ अगसिमनी, अंतोन सोझ, पावुल फर्नांडिस यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





