Wednesday, October 9, 2024

/

तयारी ‘थर्टी फर्स्ट’ ची

 belgaum

नववर्ष 2020 उंबरठ्यावर येऊ घातले आहे, आता जुने जे जे कटु आहे ते ते सर्व मागे टाकून नव्याचे स्वागत करणे महत्त्वाचे. म्हणूनच तर बेळगाव शहरात 2019 या सरत्या वर्षाला निरोप देण्याची व 2020 या नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी जोमाने सुरू झाली आहे.

ओल्ड मॅनचे दहन करून नववर्षाचे स्वागत करण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे सध्या शहराच्या गल्लीबोळात ओल्ड मॅन तयार होत आहेत. पूर्वी फक्त कॅम्पमध्ये मोठ्या उंचीचे ओल्डमॅन तयार केले जात असत. हे ओल्ड मॅन म्हणजे शहरवासीयांसाठी एक प्रकारचे अप्रूपच असायचे. आता मात्र कॅम्प बरोबरच मध्यवर्ती शहर आणि टिळकवाडी, अनगोळ, वडगाव यासह अन्य उपनगरात ओल्ड मॅन तयार करण्याचे आणि 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता त्यांचे दहन करण्याचे प्रस्थ वाढले आहे.

नवीन वर्ष म्हणजे जल्लोष आणि पार्ट्या हे समीकरण ठरलेले. त्यामुळे आत्तापासूनच पार्ट्यांचे बेत आखले जात असून त्यामध्ये तरुणाई आघाडीवर आहे. शहर व ग्रामीण भागातील तरुणाईला तर ख्रिसमस संपताच नववर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. यापैकी काही जणांनी एखाद्या पर्यटन स्थळी जाऊन 31डिसेंबर साजरा करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. तरुणाई प्रमाणेच नोकरदार, अधिकारी (पोलीस वगळता) व व्यापारी वर्गालाही ‘थर्टी ट्रस्ट’च्या अर्थात 31 डिसेंबरच्या रात्रीचे वेध लागले आहेत. तसेच त्या रात्रीचे मेजवानीची बेत देखील आखले जात आहेत.

नववर्षाच्या प्रारंभ होण्यास काही मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने सोशल मीडियावर आतापासूनच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या संदेशांची देवाण-घेवाण सुरू झाली आहे. त्यामध्ये महत्त्वाचा एक संदेश व्हायरल होत आहे. तो म्हणजे येत्या नूतन वर्षात कोणत्याही कागदपत्रांवर तारीख व साल लिहिताना 1/1/2020 असे पुर्ण लिहिण्याची खबरदारी घ्यावी. विशेष करून साल लिहिताना ते संपूर्ण लिहिण्याची खबरदारी घेण्याचे कारण हे की जर साल फक्त 20 असे लिहिले तर त्याच्या मागे किंवा पुढे आकडा टाकून ते साल सोयीनुसार बदलता येऊ शकते हे लक्षात घ्या असे आवाहन सदर संदेशाद्वारे करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे सर्व हॉटेल्सनी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी पॅकेजेस जाहीर केली आहेत. त्यामध्ये डान्स फ्लोअर हे विशेष आकर्षण आहे. नववर्ष उंबरठ्यावर आले असल्याने हॉटेल्सना आकर्षक विद्युत रोषणाई करण्याची तयारी सध्या जोमाने सुरू झाली आहे. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी उत्साही मंडळींकडून हॉटेल्सचे बुकिंग सुरू झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.