बेळगाव लाईव्ह : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिखले येथील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अक्षय अनंत गावडे (वय ३०) असे मृताचे नाव असून त्यांच्या निधनाने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी (ता. १०) सकाळी कामानिमित्त बेळगावकडे जात असताना कालमणीजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात अक्षय गावडे यांना डोके, हात-पायांसह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या भावालाही दुखापत झाली.
अपघातानंतर दोघांनाही तातडीने बेळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच मंगळवारी (ता. १४) मध्यरात्री अक्षय यांचे निधन झाले. या घटनेची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अक्षय गावडे हे बेळगावातील एका खासगी कंपनीत एचआर पदावर कार्यरत होते. त्याचबरोबर ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव तसेच क्रिकेट कार्यकारी समितीमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे होते.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली व भाऊ असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने चिखले गावात शोककळा पसरली आहे. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.





