बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील पोलीस विभागाच्या कारभारावर सध्या वादंग निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित पूर्वतयारी शांतता बैठकीत रौडीशीटरला सहभागी करून घेतल्याच्या घटनेमुळे ब्लॉक काँग्रेसने जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.
खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल.एच. गौंडी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीत रौडीशीटरची उपस्थिती आढळून आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ही बाब संविधानाचा अपमान असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष तथा वकील ईश्वर घाडी यांनी सांगितले की, “राज्यात संविधानाचा सन्मान करणारे सरकार असूनही पोलीसच रौडीशीटरना बैठकीत सहभागी करून घेत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.” त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, या घटनेविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, योग्य कारवाई न झाल्यास गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद मागण्यात येईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
या प्रसंगी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महांतेश राहुत, महिला काँग्रेस अध्यक्षा सावित्री मादार, सूर्यकांत कुलकर्णी, सुरेश जाधव, तोहीद चादखानवर, गुड्डू साब तेकडी आणि दीपक खवटनकर आदी उपस्थित होते.





