belgaum

काव्य लेखन कार्यशाळेत कवितेचे गूढ उलगडले

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :
शब्दगंध कवी मंडळ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि. २८ जून) रोजी मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणप्रेमी सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रा. अशोक अलगोंडी यांनी केले. प्रसिद्ध कवी अजय कांडर तसेच कवी, पत्रकार आणि लेखक विजय चोरमारे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक अलगोंडी होते. पाहुण्यांचा परिचय बसवंत शहापूरकर यांनी करून दिला.

कार्यशाळेत कविता म्हणजे काय, कवितेचे स्वरूप, विविध प्रकार, आधुनिक मराठी कवितेचा प्रवास, कवितेची निर्मिती प्रक्रिया, चांगल्या कवितेची वैशिष्ट्ये आणि प्रभावी कविता लेखन या विषयांवर व्याख्यान, प्रश्नोत्तरे आणि चर्चेद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 belgaum

कवी, पत्रकार आणि लेखक विजय चोरमारे यांनी मार्गदर्शन करताना, “केवळ टाळ्यांचा कडकडाट मिळवणाऱ्या कविता म्हणजे खरी कविता नव्हे. उत्तम कविता समजून घेण्यासाठी चांगल्या कविता वाचल्या पाहिजेत आणि समकालीन कवींच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे,” असे प्रतिपादन केले.

ते पुढे म्हणाले, “माणसाच्या आयुष्यात कविता का येते आणि कविता म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. जेव्हा भरड वस्त्र परिधान करताना शालू नेसण्याची भावना मनात निर्माण होते, तीच कविता असते.” त्यांनी कवितेतील मूल्यविचार, भावविश्व आणि विज्ञाननिष्ठा यांचे महत्त्वही अधोरेखित केले.

कवी केशवसुत यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी, “कविता म्हणजे वीज असते आणि ती शंभरात एखाद्यालाच सापडते; बाकीचे त्यात जळून खाक होतात,” असे सांगितले. तसेच एका हिंदी कवीचे उदाहरण देत, “जेव्हा आत्महत्येचा विचार मनात येतो, तेव्हा त्या कवीसाठी त्याचा पर्याय कविता असते,” असे सांगून त्यांनी मानवी जीवनातील कवितेचे स्थान स्पष्ट केले. बालगीतातून जन्मापासूनच कविता आपल्या आयुष्याचा भाग बनते आणि सातत्यपूर्ण वाचन व सरावातून कविता अधिक प्रगल्भ होत जाते, असेही त्यांनी सांगितले.

दुसरे मार्गदर्शक कवी अजय कांडर यांची उर्मिला शहा आणि सुधाकर गावडे यांनी मुलाखत घेतली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी कवितेचा समग्र आढावा घेत कार्यशाळेचे महत्त्व विशद केले.

“जगणे आणि कविता यांची समज वाढवण्यासाठी अशा कार्यशाळा आवश्यक आहेत. सर्वकालीन टिकणारी कविता ही प्रत्येक काळाशी संवाद साधणारी कविता असते,” असे ते म्हणाले. “भाषा संपली की माणुसकी आणि संस्कृतीही संपते. समाज कोरडा होतो आणि त्याच्या जगण्याचा केंद्रबिंदू बदलतो,” असे सांगत त्यांनी माणूस आणि कविता यांतील अतूट नाते उलगडून सांगितले. वैश्विक साहित्य म्हणजे सर्व काळाला लागू पडणारे साहित्य, असेही त्यांनी नमूद केले. “तुकारामांचा विद्रोह हा माझ्या कवितेचा आत्मा आहे,” असे प्रतिपादनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रा. आनंद मेणसे, अहमद खोजा, कवी निळूभाऊ नार्वेकर, कवी शिवाजी शिंदे, लेखक विलास माळी, कणकवलीचे कवी सत्यवान साटम, निशिगंधा गावकर यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते. कार्यशाळेला विद्यार्थी, नवोदित कवी, शिक्षक आणि साहित्यप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.