बेळगाव लाईव्ह : वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सायकलस्वारांनी जगातील सर्वाधिक उंचीवरील मोटारयोग्य रस्त्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या **’खारदुंगला पास’**वर यशस्वीरीत्या सायकल चालवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘एमटीबी काश्मीर’ (MTB Kashmir) आयोजित श्रीनगर-लेह-खारदुंगला या आव्हानात्मक सायकल मोहिमेत सहभागी होत क्लबच्या सदस्यांनी सात दिवसांत सुमारे ५३० किलोमीटरचा डोंगराळ आणि कठीण प्रवास पूर्ण केला.
या मोहिमेदरम्यान सायकलस्वारांनी झोजीला पास, नामिका ला, फोटू ला, सोसपास, मॅग्नेटिक हिल आणि अखेरीस खारदुंगला पास अशा जगातील अत्यंत कठीण आणि उंच पर्वतीय मार्गांवरून सततची चढाई केली. श्रीनगरमधील लाल चौक येथून सुरू झालेला हा प्रवास सोनमर्ग, द्रास, कारगिल, बुदखारबू, नुरला आणि लेह मार्गे पूर्ण करण्यात आला.
या मोहिमेतील विशेष आकर्षण ठरल्या त्या डॉ. श्रद्धा परुळेकर. खारदुंगला पास सर करणाऱ्या त्या बेळगावच्या पहिल्या महिला सायकलस्वार ठरल्या. राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटू आणि व्यवसायाने दंतचिकित्सक असलेल्या डॉ. परुळेकर या नियमितपणे ३० ते ४० किलोमीटर सायकलिंग करून स्वतःचा फिटनेस जपतात.

या मोहिमेत सहभागी झालेले रामनाथ चोडणकर (वय ५८) यांनी चौथ्यांदा खारदुंगला पास सर करण्याचा पराक्रम केला. त्यांच्या नावावर काश्मीर ते कन्याकुमारी असा तब्बल ३,९०० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केल्याची नोंद असून, वय हे केवळ एक आकडे आहे, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले.
तसेच अतुल हेरेकर यांनी तिसऱ्यांदा खारदुंगला मोहीम पूर्ण केली. त्यांनी यापूर्वी बेळगाव ते कन्याकुमारी हा १,२३४ किलोमीटरचा प्रवास अवघ्या सहा दिवसांत पूर्ण केला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू, आयर्नमॅन ७०.३ पूर्ण करणारे आणि सुपर रँडोन्युअर किताबाचे मानकरी रोहन हरगुडे यांनी पहिल्यांदाच खारदुंगला पास सर केला. त्यांच्या नावावर बेळगाव-कन्याकुमारी (१,२३४ किमी) आणि बेळगाव-रण ऑफ कच्छ (१,५५१ किमी) अशा दीर्घ सायकल मोहिमाही आहेत.
डॉ. भास्कर परुळेकर यांनीदेखील ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करत आपल्या सायकलिंग कारकिर्दीतील सर्वात मोठी आणि सर्वाधिक उंचीवरील मोहीम गाठली.डॉ श्रद्धा परुळेकर आणि भास्कर परुळेकर यांनी धारवाड ते धनुष्यकोडी नॉन स्टॉप सायकल चालवली आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण सायकलिंग आव्हान कोणत्याही बाह्य सायकलिंग सहाय्याशिवाय पूर्ण करणारा हा एकमेव भारतीय गट ठरला. सामान आणि पाणी वाहून नेण्यासाठी बॅकअप वाहनाची व्यवस्था असली तरी संपूर्ण चढाई केवळ स्वतःची शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि सांघिक समन्वयाच्या बळावर पूर्ण करण्यात आली.
वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या या यशस्वी मोहिमेमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नवोदित सायकलस्वारांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.





