बेळगाव लाईव्ह : हालगा–मच्छे बायपास रस्त्याच्या कामामुळे येळ्ळूर गावातून सुरू असलेल्या अवजड डंपर वाहतुकीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि येळ्ळूर ग्रामस्थांनी रविवारी सकाळी ११ वाजता येळ्ळूर वेशी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या.
येळ्ळूर मार्गे सुरू असलेली डंपर, वाळू, विटा आणि मातीची वाहतूक तातडीने बंद करून पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, तसेच खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
घटनेची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्काप्पा जोडट्टी हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका ऐकून घेत संबंधित कंत्राटदाराला घटनास्थळी बोलावून चर्चा केली.
चर्चेनंतर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत या मार्गावर डंपर वाहतूक बंद ठेवण्याचे, बायपासच्या कामाच्या ठिकाणी रस्त्यावर चिखल होणार नाही याची दक्षता घेण्याचे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याचे आश्वासन देण्यात आले. अशोका बिल्डकॉनचे सुपरवायझर पंकज माळी यांनाही पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी यरमाळ–येळ्ळूर मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. डंपर चालकांनी गावातून वाहने सावकाश चालवावीत, अशा सूचनाही देण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या येळ्ळूर विभागाचे कार्याध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी यांनी केली.
आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी समितीचे सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर, उपाध्यक्ष राजू पावले, दत्ता उघाडे, डी. जी. पाटील, डॉ. विवेक मेणसे, सतीश कुगजी, सूरज गोरल, दयानंद उघाडे, राकेश परीट यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.




