बेळगाव लाईव्ह :
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. जे. गंगाई यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि वकिलांची बैठक घेण्यात आली. बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा, पायाभूत कामे आणि शासनाकडे करावयाच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शनिवारी सकाळी अध्यक्ष बी. जे. गंगाई, कार्यकारिणी सदस्य, स्टेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. ए. आर. पाटील, अॅड. मारुती कामाणाचे तसेच इतर वकिलांनी न्यायालय परिसराची पाहणी करून विशेषतः पार्किंग समस्येची प्रत्यक्ष पाहणी केली.
बैठकीत न्यायालय परिसरातील वाहनतळाची शिस्तबद्ध व्यवस्था करण्यासाठी पार्किंगचे नवीन लेआउट तयार करून पांढरे पट्टे मारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. न्यायालय परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही करण्यात आली.सर्व वकिलांना अभ्यासासाठी डिजिटल लायब्ररी सुविधा देण्यावर चर्चा झाली.

याशिवाय वकिलांसाठी स्वतंत्र ‘वकील कॉलनी’ उभारण्यासाठी शासनाकडे जागेची मागणी करण्याचा निर्णय चर्चेत घेण्यात आला. न्यायालयात येणाऱ्या महिला पक्षकारांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा, वकिलांसाठी शासनाकडून विविध योजना व सुविधा उपलब्ध करून देणे, न्यायालय परिसरात कायमस्वरूपी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे, तसेच वकील आणि पक्षकारांसाठी माफक दरात दर्जेदार कॅन्टीन/हॉटेल सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
ज्येष्ठ वकिलांना विमा संरक्षण, आयुष्मान भारत योजनेचा लाभ आणि आरोग्यविषयक सरकारी सुविधा मिळाव्यात, यासाठीही शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बार असोसिएशनने न्यायालय परिसरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि वकिलांसह पक्षकारांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे विविध मागण्या मांडण्याचा निर्धार व्यक्त केला.




