बेळगाव लाईव्ह: बनावट कागदपत्रे, खोटे शासकीय शिक्के आणि तोतयागिरीच्या माध्यमातून मिळकतींचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचे प्रकार वाढत असून, अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे, अशी मागणी वकील व सामाजिक कार्यकर्ते सचिन बिच्चू यांनी केली.
नानावाडी येथील कै. प्रभात दिनकर देसाई यांच्या सुमारे ७ एकर बिगरशेती जमिनीच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाचा प्रकार पत्रकार परिषदेत मांडताना सचिन बिच्चू यांनी गंभीर आरोप केले. प्रभात देसाई यांचे नोव्हेंबर २०२५ मध्ये निधन झाले. त्यापूर्वी ७ मार्च २०२५ रोजी त्यांनी बेळगाव उपनिबंधक कार्यालयात आपले अंतिम मृत्युपत्र नोंदणीकृत केले होते. या मृत्युपत्राद्वारे नानावाडी येथील ७ एकर जमीन त्यांची मुलगी अमांडा सोनी देसाई यांच्या नावे करण्यात आली होती, असे सचिन बिच्चू यांनी सांगितले.
मात्र, संबंधित जमिनीची पुढील प्रक्रिया सुरू असताना उतारा तपासला असता ७ जून २०२६ रोजी सुरेश श्रीपाद देशपांडे यांच्या नावाची फेरफार नोंद झाल्याचे निदर्शनास आले. या नोंदीचा आधार तपासला असता २४ नोव्हेंबर १९८४ रोजी प्रभात देसाई यांनी सुरेश देशपांडे यांच्या नावे कथित मृत्युपत्र केल्याची प्रमाणित प्रत महसूल अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आल्याचे समोर आल्याचे सचिन बिच्चू यांनी सांगितले.
या फेरफार नोंदीच्या प्रक्रियेत प्रभात देसाई यांच्या कोणत्याही कायदेशीर वारसदाराला नोटीस देण्यात आली नाही, तसेच कथित १९८४ च्या मृत्युपत्राबाबत आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया किंवा कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली नसल्याचा आरोप सचिन बिच्चू यांनी केला.
उपनिबंधक कार्यालयात मृत्युपत्राची नोंदच नाही?
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी जिल्हा निबंधकांकडे चौकशी करण्यास सांगितल्याचे सचिन बिच्चू यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा निबंधक आणि संबंधित उपनिबंधक कार्यालयातील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
या पडताळणीत २४ नोव्हेंबर १९८४ रोजी असे कोणतेही मृत्युपत्र नोंदणीकृत झाल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा सचिन बिच्चू यांनी केला. महसूल अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आलेली कथित प्रमाणित प्रतही बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.

कथित १९८४ च्या मृत्युपत्रातील माहितीमध्येही गंभीर विसंगती असल्याचे सचिन बिच्चू यांनी निदर्शनास आणून दिले. या मृत्युपत्रात प्रभात देसाई यांचे १९८४ मध्ये वय ६८ वर्षे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असल्यास २०२५ मध्ये निधनाच्या वेळी त्यांचे वय १०८ वर्षे झाले असते, अशी विसंगती त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
‘बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावण्याचा प्रयत्न’
“सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के, खोट्या सह्या आणि बनावट आधारकार्ड तयार करून मिळकतींचे हस्तांतरण करण्याचे प्रकार अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणामागे कोण आहेत आणि या संपूर्ण प्रकाराचे सूत्रधार कोण आहेत, याचा पोलिसांनी शोध घेणे आवश्यक आहे,” असे सचिन बिच्चू यांनी म्हटले.
अशा प्रकारांमध्ये प्रथम बनावट कागदपत्रांच्या आधारे एखादी मिळकत दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित केली जाते. त्यानंतर तीच मिळकत दुसऱ्या व्यक्तीला विक्री करून वाद निर्माण केला जातो. पुढे मूळ मालकाशी तडजोड करण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सचिन बिच्चू यांनी केला.
हा प्रकार ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार असून, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
बेळगावमध्ये गेल्या काही महिन्यांत अशा स्वरूपाची अनेक प्रकरणे समोर आल्याचा दावा करत, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून या प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सचिन बिच्चू यांनी केली.
तसेच सुरेश श्रीपाद देशपांडे यांच्यासह बनावट कागदपत्रांच्या निर्मिती अथवा वापरात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही सचिन बिच्चू यांनी केली.




