belgaum

5 हजार पोलीस 14 ड्रोन आणि 1 हजार CCTV असणार नजर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह | गणेश विसर्जन विशेष बंदोबस्त: गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शहरात ५ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि साध्या वेशातील पोलिसांच्या माध्यमातून विशेष नजर ठेवली जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस परेड मैदानावर रोल कॉल घेण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना विसर्जन बंदोबस्ताची माहिती दिली.

२४ तासांत विसर्जन पूर्ण करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट

बेळगाव शहरात यंदाच्या गणेश विसर्जनासाठी सुमारे १,०५० गणेशमूर्तींचे सात नियोजित ठिकाणी आणि होंडांमध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. मागील वर्षी विसर्जन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे ३६ तास लागले होते. यंदा ही प्रक्रिया २४ तासांत पूर्ण करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे.

यासाठी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त स्तरावर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या असून, विसर्जन लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

५ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ५ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंदोबस्तामध्ये दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी, तीन डीसीपी आणि विविध एसीपींसह कर्नाटक स्टेट रिझर्व्ह पोलिसांच्या १० तुकड्या, सिटी आर्म्ड रिझर्व्हच्या ९ तुकड्या आणि रॅपिड ॲक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

तसेच, गर्दीमध्ये साध्या वेशातील १०० हून अधिक पोलिस कर्मचारी गस्त घालणार आहेत. मिरवणुकीदरम्यान फटाके फेकणे किंवा इतर अनुचित प्रकार घडू नयेत, यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून निगराणी

शहरातील विद्यमान सीसीटीव्ही यंत्रणेसोबतच मिरवणूक मार्ग आणि अतिसंवेदनशील ठिकाणी अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उपलब्ध पोलिस माहितीनुसार, १,००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि १४ ड्रोनच्या माध्यमातून शहरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

कर्नाटक पोलिसांच्या पत्रकानुसार, मिरवणूक मार्गावर १२ ड्रोन कॅमेरे आणि १८ व्हिडिओग्राफरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मिरवणूक मार्गावरील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

पाणवठ्यांजवळ एसडीआरएफची पथके तैनात

गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी नदी आणि पाणवठ्यांच्या परिसरात ८ एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. एखादी व्यक्ती पाण्यात पडल्यास तातडीने बचावकार्य करता यावे, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय शहरातील आठ ठिकाणी रुग्णवाहिका आणि पाच ठिकाणी अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. अतिरिक्त यांत्रिक पथके आणि वाहनचालकांचीही राखीव व्यवस्था करण्यात आली आहे.

लेझर आणि प्लाझ्मा लाइटवर बंदी

गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये उच्च तीव्रतेच्या लेझर लाइट आणि प्लाझ्मा लाइटचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकांकडून डीजे सिस्टीमवर देखरेख ठेवण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर २४ तास नजर

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोशल मीडियावर २४ तास देखरेख करण्यासाठी १३ पथके कार्यरत आहेत. याशिवाय विध्वंसक कृत्यांना आळा घालण्यासाठी चार एएससी पथके तैनात करण्यात आली आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत २४ जणांना हद्दपार करण्यात आले असून, एका व्यक्तीवर गुंडा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच ९९२ रौडी आणि जातीय रौडी व्यक्तींवर बाँड ओव्हरची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या पत्रकात देण्यात आली आहे.

शहर ३२ सेक्टरमध्ये विभागले

बेळगाव शहराची ३२ सेक्टरमध्ये विभागणी करून ३३ शक्ती वाहने, १५ होयसळ वाहने आणि ९ हायवे पेट्रोलिंग वाहने तैनात करण्यात आली आहेत. मिरवणूक मार्गावर १० पुश-अप आणि पिकअप स्टँडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सेंट्रल आणि बायलेन ड्युटीसाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी १०० ठिकाणी बॅरिकेडिंग पॉइंट्स आणि आठ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील काही भागांत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विविध विभागांच्या समन्वयातून बंदोबस्त

गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी बेळगाव महानगरपालिका, हेस्कॉम, वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयातून तयारी करण्यात आली आहे.

गणेश मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. विसर्जन कार्यक्रम शांततेत आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.