belgaum

जे. जे. सिंह यांच्याकडून जवानांना ‘फाइट टू विन’चा मंत्र

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठा एलआय रेजिमेंटचे मानद कर्नल आणि निवृत्त जनरल जे. जे. सिंह, PVSM, AVSM, VSM, ADC यांनी सोमवारी बेळगाव येथील मराठा एलआय रेजिमेंटल सेंटरला भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे रेजिमेंटमधील आजी-माजी सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, SM, VSM यांनी जनरल जे. जे. सिंह यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना सेंटरमधील प्रशिक्षण उपक्रम तसेच कार्यरत जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.

भेटीदरम्यान जनरल जे. जे. सिंह यांनी सेंटरमधील आधुनिक प्रशिक्षण सुविधांची पाहणी केली. बदलत्या युद्धपद्धती आणि भविष्यातील रणांगणातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तरुण सैनिकांना तयार करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांची त्यांनी माहिती घेतली.

 belgaum

यावेळी त्यांनी अधिकारी, JCOs, OR तसेच माजी सैनिकांशी संवाद साधला. सैनिकांची कर्तव्यनिष्ठा, व्यावसायिकता आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच सर्व पदांवरील जवानांनी उत्कृष्टतेचा ध्यास कायम ठेवत विजयासाठी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन केले.

जवानांना प्रेरणा देताना जनरल जे. जे. सिंह यांनी, “फाइट टू विन अँड विन विथ अ नॉकआउट, ॲज देअर इज नो सेकंड इन द बॅटलफिल्ड” असा संदेश दिला. रणांगणात दुसरी संधी नसते, त्यामुळे विजयासाठी पूर्ण क्षमतेने लढण्याचा निर्धार प्रत्येक सैनिकाने ठेवावा, असा त्यांच्या संदेशाचा आशय होता.

जनरल जे. जे. सिंह यांच्या या भेटीमुळे रेजिमेंटमधील आजी-माजी सैनिकांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाले. धैर्य, बंधुभाव, शिस्त आणि राष्ट्रसेवा या मूल्यांना अधोरेखित करणारी ही भेट ठरली.

मराठा एलआय रेजिमेंटची गौरवशाली परंपरा, माजी सैनिकांशी असलेले घट्ट नाते आणि ‘ड्युटी, ऑनर अँड करेज’ या ब्रीदभावनेची आठवण करून देणारा हा प्रेरणादायी प्रसंग ठरला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.