बेळगाव लाईव्ह : महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे खासगीकरण, कामगारांचे प्रश्न आणि सामाजिक भेदभावाच्या मुद्द्यांवरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘चेंज इज नॅसेसरी रॅली’ला पाठिंबा देत ही निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्या मांडण्यात आल्या.
सीपीआयचे जिल्हा सचिव अनिल आजगावकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. २०१४ पासून सरकारने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला. युवकांना रोजगार, वाढती महागाई, शिक्षणाचे खासगीकरण, दलितांवरील अत्याचार आणि कामगारांच्या हक्कांचा प्रश्न याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तसेच निवडणुकांमध्ये पुन्हा बॅलेट पेपरचा वापर करावा, लोकशाहीचे संरक्षण करावे आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात अनिल आजगावकर यांच्यासह नागेश सतेरी, कृष्णा शाहापूरकर, आनंद मेणसे आणि कॉम्रेड कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.





