belgaum

तिलारी पाणी योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील तिलारी जलविद्युत प्रकल्पाखालील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीच्या माध्यमातून राकसकोप धरणात आणून शेतीसाठी वापरण्याच्या प्रस्तावाला आता आणखी एक पुढचे पाऊल पडले आहे. या संदर्भात मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

तिलारी परिसरातील देवनाळा, भंडोराण नाळा आणि पाणीपरमार नाळा येथे प्रस्तावित असलेल्या तीन बंधाऱ्यांमधील पाणी वीजनिर्मितीसाठी वापरल्यानंतर ते कोकणात सोडण्याऐवजी मार्कंडेय नदीच्या माध्यमातून राकसकोप धरणात वळवावे, अशी या प्रस्तावाची संकल्पना आहे. या पाण्याचा उपयोग चंदगड तालुक्यातील आठ गावांसह बेळगाव तालुक्यातील सुमारे २० ते २२ गावांना शेतीसाठी होऊ शकतो, असा दावा बैठकीत करण्यात आला.

या बैठकीला चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, बेळगावचे माजी महापौर व माजी नगरसेवक शिवाजी सुंठकर, KPCC सदस्य सहाय्यक मलगौडा पाटील यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री काही कारणास्तव बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांच्या वतीने मलगौडा पाटील यांनी या विषयाची बाजू मांडली.

 belgaum

दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प करण्याची मागणी

माजी आमदार राजेश पाटील यांनी सांगितले की, तिलारी प्रकल्पाखालील पाणी खाली कोकणात न सोडता ते मार्कंडेय नदीच्या माध्यमातून राकसकोप धरणात आणल्यास चंदगड तालुक्यातील आठ आणि बेळगाव तालुक्यातील सुमारे २० गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.

तसेच, महाराष्ट्रातील जत तालुक्याला कर्नाटकातील म्हैसाळ प्रकल्पातून पाणी देण्याचा मुद्दाही यासोबत जोडता येऊ शकतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने हा प्रकल्प संयुक्त उपक्रम म्हणून राबवल्यास दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असे पाटील यांनी सांगितले.

या संकल्पनेचा पाठपुरावा स्वर्गीय नरसिंगराव पाटील आणि माजी खासदार सुरेश अंगडी यांनी यापूर्वी केला होता. आपण आमदार असताना गेल्या पाच वर्षांपासून या विषयाचा पाठपुरावा करत असल्याचेही राजेश पाटील यांनी सांगितले. आता खासदार जगदीश शेट्टर आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार जगदीश शेट्टर यांनी फडणवीसांना लिहिले होते पत्र

दरम्यान, बेळगाव परिसरातील माजी नगरसेवकांनी यापूर्वी खासदार जगदीश शेट्टर तसेच पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन तिलारीचे अतिरिक्त पाणी बेळगावकडे वळवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या विषयाकडे लक्ष वेधले होते.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अभ्यास करून पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन

माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून तिलारीचे पाणी वाया न जाता मार्कंडेय नदीत वळवण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यात येत आहे. या प्रकल्पाचा फायदा बेळगाव शहरासोबतच आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांनाही होऊ शकतो.

हिंडलगा पंपिंग स्टेशनमधून जानेवारीनंतर एप्रिल-मेपर्यंत पाणी उपसा करून लक्ष्मी टेकडीकडे नेले जाते. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पामुळे शहरातील पाणीपुरवठा आणि शेती या दोन्ही बाबींना फायदा होऊ शकतो, असे सुंठकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या प्रस्तावाचा अभ्यास करून पुन्हा बैठक बोलावण्याचे आश्वासन दिल्याचे सुंठकर यांनी सांगितले. तसेच पालकमंत्र्यांनीही हा प्रकल्प सकारात्मक असल्याचे सांगून राजेश पाटील आणि संबंधित लोकप्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी दर्शविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तिलारीचे पाणी राकसकोपमध्ये आणण्याचा हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला, तर सीमाभागातील दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी बैठकीत या प्रकल्पाच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींवर काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे. इतके वेळी माजी नगरसेवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.